मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो ९ मार्गिकेवरील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ बुधवारी, ८ एप्रिलपासून सेवेत दाखल झाला आहे. त्यानुसार दहिसर ते काशीगाव टप्पा प्रवाशांच्या पसंतीस पडला आहे. मात्र, दुसरीकडे डायमंड गार्डन ते मंडाले टप्प्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

दहिसर ते काशीगाव मार्गिकेवरून दिवसाला सरासरी २२ हजार ३५६ प्रवासी प्रवास करत आहेत. डायमंड गार्डन ते मंडाले मार्गिकेवरून दिवसाला सरासरी केवळ ३ हजार ८८५ प्रवासी प्रवास करत आहेत. डायमंड गार्डन ते मंडाले टप्प्यात केवळ ५ मेट्रो स्थानके असून त्यापुढे प्रवाशांना इतर वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागतो. त्यामुळे प्रवासी मेट्रोकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. सहा मेट्रो मार्गिका कार्यान्वितमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्पांतील चार मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होत्या. त्यात आता आणखी दोन मार्गिकांची भर पडली असून कार्यान्वित मेट्रो मार्गिकांची संख्या सहावर गेली आहे. काशीगाव ते दहिसर आणि डायमंड गार्डन ते मंडाले मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात होता. त्यानुसार काशीगाव ते दहिसर मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र डायमंड गार्डन ते मंडालेकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार ८ ते १२ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत मेट्रो २अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम), मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली), मेट्रो ९ (काशीगाव ते दहिसर) आणि मेट्रो २ब (डायमंड गार्डन ते मंडाले) मार्गिकेवरून १४ लाख २५ हजार ३७९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो २अ मार्गिकेवरून ७ लाख ५३ हजार ७६३ प्रवाशांनी, मेट्रो ७ मार्गिकेवरून ५ लाख ४० हजार ४१० प्रवाशांनी, मेट्रो ९ मार्गिकेवरून १ लाख ११ हजार ७८० प्रवाशांनी तर मेट्रो २ब मार्गिकेवरून १९ हजार ४२६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

मेट्रो २ब ला अत्यल्प प्रतिसाद काशीगाव ते दहिसर मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्याने आता काशीगाववरून थेट गुंदवली, अंधेरीपर्यंत प्रवास करता येत आहे. तर दहिसरवरून मेट्रो २अ मार्गिकेने अंधेरी पश्चिमपर्यंतचाही प्रवास करता येत आहे. त्यामुळे या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ८ ते १२ एप्रिलदरम्यान या मार्गिकेवरून १ लाख ११ हजार ७८० प्रवाशांनी प्रवास केला आहे. म्हणजेच दिवसाला या मार्गिकेवरून सरासरी २२ हजार ३५६ प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र दुसरीकडे डायमंड गार्डन ते मंडालेला अत्यल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मार्गिकेत केवळ पाचच स्थानके असून डायमंड गार्डन वा मंडालेवरून पुढे रेल्वे, बस, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करून इच्छित स्थळ गाठावे लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी इच्छित स्थळ गाठण्यासाठी प्रवासी मेट्रोऐवजी इतर पर्यायांचा वापर करताना दिसत आहेत. तर डायमंड गार्डन ते मंडाले अशी मार्गिका सुरू करण्याची घाई एमएमआरडीएने का केली आणि काही टप्पा सुरू करून मेट्रो सेवेत दाखल करणे आवश्यक होते, असेही प्रवाशांकडून सांगितले जात आहे.

तेव्हा मेट्रो २ब मार्गिका वांद्रे-कुर्ला संकुल वा अंधेरी पश्चिमपर्यंत धावू लागल्यानंतरच या मार्गिकेला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांनी उन्हाळी सुट्टी असल्याने मेट्रो प्रवासांची संख्या काहीशी कमी असल्याचे सांगितले आहे.

मुंबई १ कार्डधारकांची संख्या वाढली

मुंबईत दोन नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्याने प्रवाशांची संख्या एक लाखांहून अधिक वाढली आहे. या अनुषंगाने मुंबई १ कार्डधारकांचीही संख्या वाढली आहे. कार्डधारकांच्या संख्येत ३७.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आजच्या घडीला ५ लाख ३३ हजार १६५ प्रवासी मुंबई १ कार्डचा वापर करत आहेत. तर ई-तिकिटाकडेही प्रवाशांचा कल आहे. दोन लाख ९३ हजार ८१९ प्रवाशांनी ८ ते १२ एप्रिलपर्यंत व्हॉट्सअॅप तिकिटाचा वापर केला आहे. तर मोबाईल क्यूआर तिकीट विक्रीची संख्या ७७ हजार १९३ अशी आहे. पेपर क्यूआर तिकीट घेणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार २०२ अशी आहे।