मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्पा १ वरून गारेगार, अतिजलद प्रवास करण्याची प्रवाशांची प्रतीक्षा अखेर बुधवारी संपुष्टात आली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी ६ वाजता काशीगाव मेट्रो स्थानकावरून, तसेच डायमंड गार्डन आणि मंडाले स्थानकांवरून पहिली मेट्रो गाडी सुटली. मेट्रोमधून पहिला प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांनी मेट्रो स्थानकावर गर्दी केली होती.
मेट्रोतून प्रवास करण्यासाठी दहिसर स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी दाखल झाले होते. पहिला मेट्रो प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. तर पहिल्या दिवशी मेट्रो प्रवास कसा असतो, किती वेळात मेट्रो प्रवास होतो, मेट्रो प्रवास फायदेशीर ठरेल का हे पाहण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे नव्या दोन मेट्रो मार्गिकांचा पहिला दिवस हौशी प्रवाशांचा, जॉय राईडचा ठरला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा १ आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्पा १ चे काम डिसेंबर २०२५ मध्येच पूर्ण झाले होते. या टप्प्यांना सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले होते. मात्र या दोन्ही टप्प्यांच्या लोकार्पणासाठी मुहूर्त मिळत नसल्याने काशीगाव – अंधेरी आणि डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान मेट्रो प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न लांबणीवर पडले होते. मात्र या दोन्ही टप्प्यांचे लोकार्पण मंगळवारी झाले आणि प्रवाशांचे स्वप्न अखेर बुधवारी पूर्ण झाले. बुधवारी सकाळी ६ वाजता फुलांनी सजलेली पहिली मेट्रो गाडी मंडाले, डायमंड गार्डन आणि काशीगाव मेट्रो स्थानकावरून सुटली.
यावेळी प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात, उत्साही वातावरणात मेट्रो गाडीचे स्वागत केले. पहिला मेट्रो प्रवास करण्यासाठी सकाळी प्रवाशांनी मेट्रो स्थानक गाठले. नवीन मेट्रो स्थानकात प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढू लागली. दुपारी गर्दीत वाढ झाली. दहिसर मेट्रो स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान सुरक्षा रक्षकांसमोर होते.
काशीगाव – दहिसर आणि पुढे अंधेरीपर्यंत सकाळी आणि सायंकाळी रस्ते प्रवास करणे म्हणजे मोठी कसरत असते. प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वेळ वाया घालवावा लागतो. पण आता काशीगाव – अंधेरी प्रवासासाठी मेट्रोचा पर्याय बुधवारपासून खुला झाला. हा पर्याय अतिजलद, सुकर ठरतो का हे पाहण्यासाठी, मेट्रोच्या पहिल्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी प्रवाशांनी बुधवारी मेट्रो स्थानकांवर गर्दी केली होती. नोकरदारांचा यात समावेश होता, पण पहिला मेट्रो प्रवास करण्यासाठी आलेल्यांची संख्या अधिक होती. पहिल्या दिवशी काशीगाव, दहिसर आणि डायमंड गार्डन स्थानकांवर अधिक गर्दी दिसून आली. मंडाले – डायमंड गार्डन प्रवास अतिजलद, गारेगार होत असल्याने प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिली. मोठ्या उत्साही वातावरणात मेट्रोचे स्वागत केले. पहिल्या दिवशी मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला. या मार्गिकांना नेमका कसा प्रतिसाद मिळतो, अपेक्षित प्रवासी संख्या गाठण्यात एमएमआरडीएला यश येते का हे आता लवकरच स्पष्ट होईल.
मी मिरारोडचा रहिवासी आहे. मेट्रो प्रवासाचा अनुभव मला घ्यायचा होता. त्यामुळे मी आज सकाळीच काशीगाव मेट्रो स्थानकात आलो होतो. मेट्रो प्रवास करणार असल्याने आनंद होताच, पण त्यात मी काशीगाववरून प्रवास करणारा पहिला प्रवासी ठरलो. पहिले तिकीट मी खरेदी केले, त्यामुळे आनंद द्विगुणित झाला. मेट्रो हा सुकर प्रवासाचा एक पर्याय आहे. त्यामुळे हा पर्याय नक्कीच फायदेशीर ठरेल, मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळेल. – गिरीश वाबविस्कर, प्रवासी
माझा हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. मी ई-तिकीट घेतले. मला तिकीटासाठी रांगेत उभे राहावे लागले नाही. आम्ही फक्त मेट्रो कशी आहे हे पाहण्यासाठी आलो होतो. आज मी डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो प्रवास केला. पहिलाच प्रवास आनंददायी होता, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली.
