मुंबई : वाहतूक कोंडी, लोकलच्या गर्दीने हैराण झालेल्या पूर्व उपनगरवासीयांचा, मिरा-भाईंदरवासीयांचा प्रवास सुकर करण्यासाठी मेट्रोसारखी सेवा मागील तीन-चार महिन्यांपासून सज्ज आहे. मात्र केवळ राज्य सरकारकडून लोकार्पण होत नसल्याने या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत नसल्याचे चित्र आहे. अशात राज्य सरकारकडून दोन नव्या मेट्रो मार्गिकेतील पहिल्या टप्प्यांच्या लोकार्पणासाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. ४ एप्रिलला होणारे लोकार्पण ६ एप्रिलवर गेले आणि आता पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून मंगळवारी (७ एप्रिल) लोकार्पण करण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षातील नेते निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने लोकार्पणाच्या तारखा पुढे गेल्याचे दिसते आहे.
दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २-ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ चे काम २०२५ अखेरीस पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्यांच्या संचालनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे. मात्र मागील तीन-चार महिन्यांपासून राज्य सरकारला लोकार्पणासाठी वेळ मिळत नसल्याने या दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे संचालन रखडले आहे. मेट्रोसारख्या सेवेपासून प्रवासी वंचित आहेत. मेट्रो ९ मार्गिकेतील टप्पा १ सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना अंधेरी ते काशीगाव असा थेट मेट्रो प्रवास करता येणार आहे पूर्व उपनगराला पहिली मेट्रो उपलब्ध होणार असून डायमंड गार्डन ते मंडाले प्रवास सुसाट, गारवा देणारा आणि सुकरपणे करता येणार आहे. पण या मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
आधी पालिका निवडणुकांची आचारसंहिता, त्यानंतर अधिवेशनामुळे रखडलेले लोकार्पण एप्रिलमध्ये होईल असे सांगण्यात आले. त्यानुसार ४ एप्रिलची वेळ राज्य सरकारकडून लोकार्पणासाठी देण्यात आली. एमएमआरडीए कामाला लागले. लोकार्पणासाठी एमएमआरडीए सज्ज असताना, लोकार्पणासाठी काही तास उरले असताना ४ एप्रिलचा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर सोमवारी, ६ एप्रिलला लोकार्पण होईल असे सांगण्यात आले. पण आता सोमवारचे लोकार्पणही रद्द झाले आहे. नेते बारामतीच्या पोटनिवडणुकीसह केरळ, आसाम आणि अन्य राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र मंगळवारी लोकार्पण पार पडणार आहेत. त्यामुळे आता दहिसर ते काशीगाव आणि डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण मंगळवारी होईल आणि त्यानंतर बुधवारपासून या मार्गिका सेवेत दाखल होतील. तर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाअंतर्गत अर्जुन टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) लॉन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्याचा कार्यक्रमही मंगळवारी होईल. तसेच बीकेसी पॉड टॅक्सीचे भूमिपूजनही त्याच दिवशी होईल.
