मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी झाले असून त्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोचे जाळे विस्तारले आहे. आता कार्यान्वित मेट्रोचे जाळे १०१ किमीवर गेले आहे. दिल्लीनंतर कार्यान्वित मेट्रोचे मोठे जाळे असणारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. येत्या चार वर्षांत मेट्रोसह सागरी मार्ग, सागरी सेतू, उड्डाणपूल, भुयारी मार्गांचेही जाळे एमएमआरमध्ये विणले जाईल आणि एमएमआरच्या कोणत्याही टोकावरून दुसऱ्या टोकाला ५९ मिनिटांत पोहोचता येईल. त्यामुळे चार वर्षांत मुंबई हे देशातील पहिले सुगम शहर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दोन नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले अशा पहिल्या टप्प्यांचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील ठाण्यातील लाँचिंग शाफ्टमध्ये ‘नायक’ नावाचे पहिले टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) सोडण्यात आले. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील पॉड टॅक्सीच्या कामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. दहिसर मेट्रो स्थानकावर काशीगाव ते दहिसर टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानंतर त्यांनी मेट्रोने प्रवासही केला. तर डायमंड गार्डन मेट्रो स्थानकावर डायमंड गार्डन ते मंडाले टप्प्याचे लोकार्पण करून डायमंड गार्डन ते देवनार दरम्यान मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केला. तर डायमंड गार्डन येथूनच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. मुंबई आणि मिरा-भाईंदर शहराला जोडणारी मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेत २०१८ मध्ये मेट्रो ९ मार्गिकेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आज या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत असून आता प्रवाशांना काही मिनिटांतच दहिसरला, अंधेरीला पोहोचता येणार आहे. त्यामुळे ही बाब मुंबई, मिरा-भाईंदरच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मेट्रो २ ब आणि ९ मार्गिकेतील पहिले टप्पे आता सेवेत दाखल होत असल्याने मुंबई महानगर प्रदेशातील कार्यान्वित मेट्रोचे जाळे १०१ किमीवर गेले आहे. एमएमआरमध्ये ११.४ किमीचे मेट्रो १, १८.६ किमीची मेट्रो २ अ, १६.५ किमीची मेट्रो ७, ३३.५ किमीची मेट्रो ३ आणि नवी मुंबईतील ११.१ किमीची मेट्रो मार्गिका अशा एकूण १०१ किमीचे जाळे झाले कार्यान्वित आहे. त्यामुळे दिल्लीनंतर एमएमआर हे देशातील सर्वाधिक कार्यान्वित मेट्रोचे जाळे असणारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. संपूर्ण ३३७ किमीचे मेट्रो जाळे पूर्ण झाल्यानंतर मुंबई हे देशातील सर्वाधिक मेट्रोचे जाळे असणारे पहिल्या क्रमांकाचे शहर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करून बीकेसीत जाणे-येणे सोपे व्हावे यासाठी पॉड टॅक्सी उपयुक्त ठरणार आहे. पॉड टॅक्सीचा प्रयोग बीकेसीत यशस्वी झाल्यास मुंबईत इतरत्रही हा प्रकल्प राबवला जाईल, असेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. तसेच ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली अंतर १५ मिनिटांत पार होणार असल्याने हा प्रकल्पही वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या बोगद्यापाठोपाठ मुंबईत आणखी ७० किमीचे भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

एमएमआरमधील वाहतूक कोंडी दूर करून दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर येत्या चार वर्षांत एमएमआरच्या कोणत्याही टोकावरून दुसऱ्या टोकाला ५९ मिनिटांत पोहोचता येईल. त्यामुळे एमएमआर हे देशातील पहिले वाहतूक कोंडीमुक्त असे सुगम शहर ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ चे लोकार्पण मंगळवारी झाले आहे. तर आता बुधवारी सकाळी सहा वाजता या दोन्ही नव्या मार्गिकांवरून पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे. बुधवारपासून या मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. तेव्हा या मार्गिकांना कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मेट्रो ९ आणि २ ब मार्गिकेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच झाले आणि आज त्यांच्याच हस्ते या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मेट्रो ९ मार्गिकेतील दुसऱ्या टप्प्याचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तेव्हा हा टप्पाही याच वर्षात सेवेत दाखल होईल. मेट्रो ९ मार्गिकेने काशीगाववरून गुंदवलीला थेट मेट्रोने आता जाता येणार आहे. भविष्यात मिरा रोडवरून थेट विमानतळ आणि पुढे कुलाब्यालाही जाणे सोपे होणार आहे. कारण मेट्रो ९ मार्गिका मेट्रो ७, ७ अ आणि ३ मार्गिकेशी जोडली जाणार आहे. एमएमआरमधील वाहतूक कोंडी सोडवून दळणवळण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न विविध प्रकल्पांद्वारे केला जात आहे. तसेच अशाच प्रयत्नांद्वारे महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था मजबूत केली जाईल. हे सर्व करण्यासाठी जी इच्छाशक्ती असावी लागते, ती आमच्याकडे आहे. त्यानुसार आमचे सरकार यादृष्टीने प्रयत्नशील राहील. – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री