मुंबई…मुंबईत धावणाऱ्या सहाही मेट्रो मार्गिकांच्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेस वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान भाविकांना, प्रवाशांना रात्री उशिराही इच्छितस्थळी प्रवास करता यावा, गणेश मंडळांना भेटी देता याव्यात व भेटी देऊन घरी परतता यावे यासाठी मेट्रो मार्गिकांचा सेवा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यानुसार १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान सहा मेट्रो मार्गिकांवर रात्री उशिरापर्यंत गाड्या धावणार आहेत. त्यामुळे भाविकांसाठी हा दिलासा ठरणार आहे.
गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन यासाठी भाविकांना मेट्रोचाही पर्याय उपलब्ध व्हावा. तसेच गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील विविध गणेश मंडळांना भेटी देणाऱ्या भाविकांना रात्री उशिरा घरी परतणे सोपे व्हावे वा रात्री उशिरा गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी पोहोचता यावे यासाठी मेट्रो मार्गिकांच्या सेवा कालावधीत वाढ करण्याची मागणी होत होती.
त्यानुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेच्या सेवा कालावधीत, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेच्या कालावधीत तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दहिसर ते काशीगाव मेट्रो ९ टप्पा १, मंडाले ते चेंबूर मेट्रो २ ब टप्पा १, दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ आणि दहिसर ते अंधेरी पश्चिम (डीएन नगर) मेट्रो २ अ मार्गिकेच्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेस वाढ केली आहे. तर मेट्रो २अ, २ब टप्पा १, ९ टप्पा १ आणि ७ मार्गिकेच्या अतिरिक्त फेऱ्यांमध्येही वाढ केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान प्रवास अधिक सुकर होणार आहे.
मेट्रो मार्गिकेनुसार वाढीव सेवा कालावधी असा
मेट्रो २ अ, २ब, ९, ७ मार्गिकेवरून शेवटची मेट्रो रात्री ११.०० वा. ऐवजी १२.३० वा. सुटणार आहे.
इतकेच नव्हे तर, मेट्रो मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब वर १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. विशेष अतिरिक्त सुविधा:
सोमवार ते शुक्रवार: मार्गिका २अ – २९९ फेऱ्या ( १०) मार्गिका ७ आणि ९ – २९० फेऱ्या ( १४) मार्गिका २ब – १८० फेऱ्या ( १५)
शनिवार: मार्गिका २अ – २४१ फेऱ्या ( १०) मार्गिका ७ आणि ९ – २३७ फेऱ्या ( १४) मार्गिका २ब – १८० फेऱ्या ( १५)
रविवार: मार्गिका २अ – २२३ फेऱ्या ( १०) मार्गिका ७ आणि ९ – २१९ फेऱ्या ( १४) मार्गिका २ब – १८० फेऱ्या ( १५) .
मेट्रो ३ मेट्रो ३ मार्गिकेवरील कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर स्थानकावरून रात्री १०.३० वाजता शेवटची गाडी पोहोचते आणि शेवटच्या स्थानकावर ११.३० दरम्यान पोहोचते. त्यामुळे या मार्गिकेवर रात्री ११.३० पर्यंत मेट्रो धावते. पण गणेशोत्सवाच्या काळात, १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर स्थानकावरून रात्री १२ वाजता शेवटची गाडी सुटणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवर मध्यरात्री १ वाजेपर्यंत मेट्रो गाड्या धावतील. मेट्रो १ शेवटच्या मेट्रो गाड्यांच्या वेळा : वर्सोवा (व्हीईआर) ते घाटकोपर (जीएचए) : रात्री १२.१५ वाजता घाटकोपर (जीएचए) ते वर्सोवा (व्हीईआर) : रात्री १२.४० वाजता घाटकोपरहून सुटणारी शेवटची मेट्रो वर्सोवा येथे रात्री १.०३ वाजता पोहोचेल.
