मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे. मेट्रोच्या कामांसाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने १०६१.७७ कोटी रुपये निधी दिला आहे. तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) २४१.७६ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या एक टक्के मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून वसूल होणारी रक्कम मेट्रोसाठी देण्यात येते. त्यानुसार एमएमआरडीए आणि एमएमआरसीला निधी वितरित करण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विणले जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत १४ मेट्रो मार्गिकांची उभारणी केली जाणार आहे. आजघडीला एमएमआरडीएकडून सहा – सात मार्गिकांची कामे सुरू आहेत. तर एमएमआरसीकडून नुकतीच मेट्रो ३ (आरे – कफ परेड) मार्गिका सेवेत दाखल करण्यात आली असून आता मेट्रो ११ (गेट वे ऑफ इंडिया – आणिक आगार, वडाळा) मार्गिकेचे काम सुरू केले जाणार आहे. तर मेट्रो ११ मार्गिकेचा विस्तार वांद्रे टर्मिनसपर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे.
विविध माध्यमांतून निधीची उभारणी केली जाते. मेट्रोसाठी निधी उभारणीसाठी एक पर्याय म्हणून मेट्रोची कामे सुरू असलेल्या पालिका क्षेत्रात मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर एक टक्के अतिरिक्त मुद्रांक शुल्क आकारले जाते. जमा झालेली एक टक्के मुद्रांक शुल्काची रक्कम त्या त्या पालिका क्षेत्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी वेळोवेळी वितरित केली जाते. त्यानुसार नगर विकास विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा निधी वितरित केला आहे. एमएमआरडीसह एमएमआरसी आणि महा मेट्रोला निधी वितरीत करण्यात आला आहे.
तब्बल १५०० कोटी रुपयांचे वितरण नगर विकास विभागाकडून करण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक १०६१.७७ कोटी रुपये एमएमआरडीएला वितरित करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ २४१.७६ कोटी रुपये निधी एमएमआरसीला देण्यात आला आहे. महा मेट्रोला पुणे आणि नागपूर पालिका क्षेत्रातील मेट्रोच्या कामासाठी १९६.४७ कोटी रुपयांचा महसूल वितरित करण्यात आला आहे. आता एमएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या कर्जावरील व्याज, कर्ज परतफेडीसाठी वा मेट्रोच्या बांधकामासाठी या निधीचा वापर करता येणार आहे. एमएमआरसीलाही मेट्रो ३ मार्गिकेसाठीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी निधी वापरता येणार आहे.
