लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढती प्रवासी संख्या सामावून घेण्यासाठी सध्याच्या चार डब्यांच्या मेट्रो गाड्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून घाटकोपर – वर्सोवादरम्यान सहा डब्यांची मेट्रो चालविण्याची मागणी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मेट्रो गाड्या सहा डब्यांच्या करण्यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) प्रयत्न सुरू आहेत. आता लवकरच ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. अखेर एमएमओपीएलने सहा डब्यांच्या मेट्रो गाड्यांसाठी अतिरिक्त डब्यांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार निधीची पूर्तता करून लवकरच मेट्रो १ च्या ताफ्यात सहा डब्यांच्या गाड्या दाखल केल्या जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास प्रवाशांना हा मोठा दिलासा मिळेल.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पातील मेट्रो १ मार्गिकेचे बांधकाम एमएमओपीएलने केले असून या मार्गिकेचे संचालन, देखभालही याच कंपनीकडून केली जाते. ही ११.४ किमीची मार्गिका आता मुंबईकरांची नवीन जीवनवाहिनी बनत आहे.

या मार्गिकेवरून पाच लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. तर दैनंदिन प्रवासी संख्येत आणखी वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, या मार्गिकेवर सुरुवातीपासून चार डब्यांच्या मेट्रो गाड्या धावत असून मुंबईतील इतर मार्गिकांवर मात्र सहा ते आठ डब्यांच्या मेट्रो धावतात. मेट्रो १ वर प्रवासी संख्या प्रचंड असताना गाड्यांची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या मार्गिकेवर सहा डब्यांची मेट्रो चालविण्याची मागणी मागील कित्येक वर्षांपासून आहे. या मागणीनुसार एमएमओपीएलने प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे सादरही केला. मात्र निधीची चणचण असल्याने अतिरिक्त डबे खरेदी करणे कठीण होत असल्याने सहा डब्यांच्या गाड्यांची अद्यापही प्रतीक्षाच आहे. या मार्गिकेवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरात लवकर डबे वाढविणे आवश्यक असल्याने एमएमओपीएलने यादृष्टीने पुन्हा प्रयत्न सुरू केल्याची माहिती एमएमओपीएलमधील अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

गाड्यांच्या मूळ उत्पादकांशी बोलणी सुरू

– अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी तसेच गाड्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी एमएमओपीएलने आता गाड्यांच्या मूळ उत्पादकांशी बोलणी सुरू केली आहेत. त्यानुसार २२ अतिरिक्त डब्यांची खरेदी लवकरच केली जाणार आहे. मात्र यासाठी निधीची पूर्तता करणे आवश्यक आहे. डबे खरेदीसाठी निधीची चणचण असून निधीच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निधीची उपलब्धता झाल्यानंतरच डबे खरेदी केले जाणार आहेत.

– निधीची उपलब्धता झाली आणि २२ अतिरिक्त डब्यांची खरेदी होऊन सहा डब्यांची मेट्रो धावू लागल्यास प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ५० टक्क्यांनी वाढणार आहे. चार डब्यांच्या मेट्रोतून एकावेळी ११७८ प्रवासी प्रवास करू शकतात. तिथे सहा डब्यांच्या मेट्रोतून एका वेळेस १७९२ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. क्षमता वाढल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होण्यास मदत होईल.