मुंबई : ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड येथे शनिवार दुपारी मेट्रोच्या खांबाचा काँक्रीट स्लॅब (पॅरापेट) उंचावरून खाली कोसळला. रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षा आणि चारचाकी वाहनावर तो कोसळला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या कामादरम्यान मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसमोरील एल.बी.एस. रोडवर शनिवार दुपारी १२.२० च्या सुमारास मेट्रोच्या खांबाचा काँक्रीट स्लॅब कोसळला. रस्त्यावरून जात असलेली रिक्षा आणि मोटारीगाडीवर हा भाग कोसळल्याने तिघे जण जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला.
जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एमएमआरडीएचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. एमएमआरडीएकडून दुर्घटनेची माहिती घेण्यात येत असून जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

या दुर्घटनेमुळे मेट्रोसह इतर पायाभूत कामांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. कामादरम्यान आवश्यक ती खबरदारी का घेण्यात आली नाही, असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

या दुर्घटनेत रामधन यादव यांचा मृत्यू झाला आहे. राजकुमार इंद्रजित यादव (४५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपासनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महेंद्र प्रताप यादव (५२) आणि दीपा रुहिया (४०) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.