श्री सिटी, आंध्र प्रदेश : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली – गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेतील गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल केला जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे या मार्गिकेच्या संचालनासाठीची पहिल्या मेट्रो गाडीची बांधणी आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील कारखान्यात पूर्ण झाली असून गाडी मुंबईत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ही गाडी श्री सिटीतून निघेल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही गाडी प्रकल्पस्थळी दाखल होईल. मात्र ही गाडी मेट्रो ४, ४ अ वर धावण्यासाठी ऑगस्ट २०२७ उजाडणार आहे. कारण तुर्तास पहिल्या टप्प्यासाठी इतर मार्गिकेवरील गाड्या चालविण्यात येणार आहेत.
एमएमआरडीएकडून अंदाजे ३५ किमीच्या मेट्रो ४, ४ अ मार्गिकेचे काम टप्प्याटप्प्यात सुरू आहे. तर, या मार्गिकेतील गायमुख ते कॅडबरी जंक्शन या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या टप्प्याच्या संचालनासाठी आता केवळ मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांचे सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान या मार्गिकेवरील मेट्रो गाड्याच्या बांधणीचे कंत्राट काही वर्षांपूर्वी काही कारणाने रद्द करण्यात आले होते. त्यामुळे गाड्याची बांधणी लांबणीवर पडली होती.
या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने तात्पुरत्या मेट्रो २ अ (दहिसर-अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर-गुंदवली) मार्गिकेवरील गाड्याचा वापर गायमुख ते कॅडबरी जंक्शन टप्प्याच्या संचालनासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे या मार्गिकेच्या रुळांच्या बांधणीसह इतर यंत्रणेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या एल अँड टीच्या माध्यमातून नव्याने ३९ गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट अल्स्टॉम कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील कारखान्यात गाड्यांची बांधणी सुरू आहे. ३९ गाड्यांपैकी पहिली गाडी अखेर तयार झाली असल्याची माहिती अल्स्टॉमचे व्यवस्थापकीय संचालक चंपक पांडा यांनी दिली. तर, उर्वरित गाड्यांच्या बांधणीच्या कामाला एक एक करून सुरुवात होणार असल्याचेही पांडा यांनी सांगितले.
पहिली तयार गाडी मुंबईत दाखल करण्यासाठी सज्ज असून लवकरच गाडी मुंबईत नेण्यात येईल, असे एल अँड टीचे महाव्यवस्थापक आशिष गुप्ता यांनी दिली. नोव्हेंबरमध्ये गाडी श्री सिटीतुन निघेल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाडी प्रकल्पस्थळी दाखल होईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान मेट्रो ४, ४ अ मार्गिकेतील पहिला टप्पा लवकरच सेवेत दाखल होणार आहे. तर पहिली गाडीही डिसेंबरमध्ये मुंबईत दाखल होणार आहे. पण ही गाडी मेट्रो ४, ४ अ मार्गिकेवरून ऑगस्ट २०२७ मध्ये धावण्याची शक्यता आहे. कारण सध्या पहिल्या टप्प्यासाठी मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेतील गाड्यांचाच वापर केला जाणार आहे. त्या गाड्यांची चाचणी ही पूर्ण झाली आहे. त्यामुळे याच गाड्या पहिल्या टप्प्यात चालवल्या जातील, असे एमएमआरडीएतील सूत्रांनी सांगितले. तर श्री सिटीतुन ऑगस्ट २०२७ पर्यंत २० गाड्या मुंबईत आणल्या जातील आणि त्यांची चाचणी करून या गाड्या मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेवर चालविल्या जातील असेही सूत्रांनी सांगितले.
मेट्रो गाडीची वैशिष्ट्ये
वाहनचालक विरहित, स्वयंचलित गाडी ७० टक्के देशी बनावटीची गाडी एकूण ३९ गाड्या, २३४ डबे एकुण प्रवासी संख्या-२२३८ कमाल वेगमर्यादा ताशी ९० किमी मोबाइल चार्जिंग सुविधा सायकलसाठी स्वतंत्र व्यवस्था भविष्यात सहा डब्यांऐवजी आठ डब्यांची गाडी करण्याची सुविधा प्रत्येक गाडीत ३६ सीसीटीव्ही कॅमेरे. २४ पॅसेंजर इमर्जन्सी अलार्म महिला डबा, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांगांसाठी राखीव आसने
