मुंबई : मिरा-भाईंदरवासियांची आणि पूर्व उपनगरवासियांची मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा अखेर आता संपणार आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले,मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ चे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. लोकार्पणानंतर, बुधवारपासून या दोन्ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. बुधवारी सकाळी ५.५० वाजता काशीगाव मेट्रो स्थानकावरून आणि डायमंड गार्डन तसेच मंडाले स्थानकावरूनही सकाळी ५.५० वाजता पहिली गाडी सुटणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे दहिसर ते काशीगाव मार्गिका सेवेत दाखल झाल्यास बुधवारपासून प्रवाशांना काशीगाव ते गुंदवली, अंधेरी असा थेट प्रवास करता येणार आहे. काशीगाववरुन दहिसर मेट्रो स्थानकाला येऊन मेट्रो २ अ ने अंधेरी पश्चिमलाही पोहचता येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने हा टप्पा सेवेत दाखल होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दुसरीकडे पूर्व उपनगराला पहिली मेट्रो मिळणार असून मानखुर्द ते चेंबूर प्रवास मेट्रोमुळे सुकर होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो मार्गिकेच्या प्रकल्पातील चार मार्गिका सध्या सेवेत दाखल आहेत. या चारही मार्गिका मुंबईत कार्यान्वित असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात आता मुंबईला आणखी दोन मार्गिका मिळणार असून कार्यान्वित मार्गिकांची संख्या सहावर पोहचणार आहे. कारण एमएमआरडीएच्या मेट्रो २ ब आणि ९ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे रखडलेले लोकार्पण अखेर आता मार्गी लागत आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
लोकार्पणानंतर बुधवारी या दोन्ही मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या केल्या जाणार आहे. दहिसर ते काशीगाव असा टप्पा सेवेत दाखल होत असल्याने ठाणे जिल्ह्याला पहिली मेट्रो मार्गिका उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे पूर्व उपनगरवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मेट्रो २ब मधील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा सुरू झाल्याने पूर्व उपनगरात पहिल्यांदाच मेट्रो धावणार आहे. दरम्यान दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिका मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेला दहिसर मेट्रो स्थानकातून जोडण्यात आली आहे. त्यामुळे काशीगाव ते गुंदवली असा थेट प्रवास मेट्रोने करता येणार आहे. काशीगाव ते दहिसर आणि पुढे दहिसर ते अंधेरी पश्चिम (डीएन नगर) प्रवास मेट्रो २ अ मार्गिकेने करता येणार आहे. प्रवाशांची वाहतूक कोंडीतून, लोकलच्या गर्दीतून मुक्तता होणार आहे. प्रवास अतिजलद होणार आहे. त्यामुळे दोन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणे ही मुंबईच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे. या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशाही एमएमआरडीएकडून यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
मेट्रो ७ आणि ९ एकत्रित (काशीगाव ते गुंदवली, अंधेरी) मार्गिकेचे वेळापत्रक असे
पहिली गाडी:सकाळी ५:५० वाजता
शेवटची गाडी: रात्री ११:००वाजता
वारंवारता: गर्दीच्या वेळेत: ५:५० मिनिटे
इतर वेळेत: ८ ते १० मिनिटे
एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – २७६, शनिवार – २२३, रविवार – २०५
मेट्रो २ अ दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम मार्गिकेचे सुधारित वेळापत्रक असे
पहिली गाडी : सकाळी ५:५० – ५:५५ वाजता
शेवटची गाडी: रात्री १०:३५ – ११:०० वाजता
वारंवारता: गर्दीच्या वेळेत: ६ मिनिटे
इतर वेळेत: ८ ते १० मिनिटे
एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – २८९, शनिवार – २३१, रविवार – २१३
नव्याने सुरु होणार्या मेट्रो २ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मार्गिकेचे वेळापत्रक असे
मार्गिकेची लांबी: ५.३८ किमी
पहिली गाडी : सकाळी ६:००
शेवटची गाडी: रात्री १०:१५ – १०:३०
वारंवारता: ९ मिनिटे ३० सेकंद
एकूण फेऱ्या: २०९
