मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘दहिसर पूर्व – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’, ‘दहिसर पूर्व – गुंदवली मेट्रो ७’, ‘डायमंड गार्डन–मंडाळे मेट्रो २ ब’ (टप्पा-१) आणि ‘दहिसर पूर्व–काशीगाव मेट्रो ९’ (टप्पा-१) मार्गिकांवरील एकूण प्रवासी संख्येने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या चार मेट्रो मार्गिकांवरून चार वर्षांत तब्बल ३० कोटी प्रवाशांनी प्रवास केला. महत्त्वाचे म्हणजे केवळ १७९ दिवसांत ३० कोटींचा टप्पा पार झाला आहे. यावरून मुंबईकर मेट्रो प्रवासाला पसंती देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांवरून सप्टेंबर २०२२ पर्यंत ५० लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. तर जानेवारी २०२३ मध्ये प्रवासी संख्येने एक कोटीचा टप्पा गाठला. सप्टेंबर २०२३ मध्ये या मार्गिकांवरून एकूण ५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. तर मे २०२४ मध्ये १० कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर १५ कोटींची प्रवासी संख्या जानेवारी २०२५ मध्ये, २० कोटी प्रवासी संख्या ऑगस्ट २०२५ मध्ये आणि २५ कोटी प्रवासी संख्या फेब्रुवारी २०२६ मध्ये गाठली. तर आता ३ ऑगस्ट रोजी एकूण प्रवासी संख्या ३० कोटींवर पोहोचली आहे.
एकूण प्रवासी संख्येत वाढ होत असतानाच दैनंदिन प्रवासी संख्येतही वाढ होत आहे. या चार मेट्रो मार्गिकांवरून आजघडीला प्रतिदिन सरासरी २.८० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. दरम्यान, आता मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर स्थानक लवकरच सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मंडाळे – चेंबूर असा थेट मेट्रो प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अतिजलद आणि सुकर प्रवासाचा पर्याय – एमएमआरडीएच्या १४ मेट्रो प्रकल्पांतील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांचा पहिला टप्पा २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. तर या मार्गिकांचा दुसरा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला.
– मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाळे – डायमंड गार्डन टप्पा-१ आणि मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा-१ एप्रिल २०२६ मध्ये सेवेत दाखल झाला. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांना अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, मागील दोन-अडीच वर्षांपासून या मार्गावर प्रवासी संख्येत वाढ होत आहे.
– एप्रिलपासून मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिका मेट्रो ९ मार्गिकेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता दहिसर ते अंधेरीऐवजी काशीगाव ते अंधेरी असा मेट्रो प्रवास करता येत आहे. तर दुसरीकडे मंडाळे ते डायमंड गार्डन मेट्रो प्रवास करता येत आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
