मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, दहिसर ते गुंदवली मेट्रो ७, दहिसर ते काशीगाव मेट्रो ९ टप्पा १ आणि मंडाले ते डायमंड गार्डन मेट्रो २ ब टप्पा १ या चार मार्गिकेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. वक्तशीरपणा, अतिजलद, सुकर प्रवास यामुळे मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळत आहेच; मात्र त्याचवेळी पावसाळ्यातही मेट्रो सेवा सुरळीत, अखंडित राहत असल्याने प्रवासी मेट्रोकडे वळत आहेत. त्यामुळे आता या चार मेट्रो मार्गिकांच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. सध्या दिवसाला या मार्गिकांवरून तीन लाख ५८ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. पावसाळ्यात प्रवासी संख्येत होणारी ही वाढ लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चारही मेट्रो मार्गिकांवर अतिरिक्त गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. गरजेप्रमाणे या गाड्या मार्गिकांवर चालविल्या जाणार आहेत.

मुंबईत सध्या सहा मेट्रो मार्गिका कार्यान्वित असून, यातील मेट्रो २ अ, ७, ९ (पहिला टप्पा) आणि २ ब (पहिला टप्पा) मार्गिकांच्या संचालनाची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका २०२२ पासून टप्प्याटप्प्याने दाखल झाल्या आहेत. तर २ ब आणि ९ मार्गिकेचा टप्पा काही दिवसांपूर्वीच सेवेत दाखल झाला आहे. मेट्रो ९ चा दहिसर ते काशीगाव टप्पा १ सेवेत दाखल झाल्याने प्रवाशांना मिरा रोड ते अंधेरी असा मेट्रो प्रवास करता येऊ लागला असून, त्यामुळे आता मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या वाढत आहे. सुरुवातीला या दोन मार्गिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता प्रतिसाद वाढत असून, आणखी दोन मार्गिका सेवेत दाखल झाल्या आहेत. या मार्गिकांना प्रवाशांची पसंती मिळत असल्याने आता दैनंदिन प्रवासी संख्या तीन लाख ५८ हजारांवर गेल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. सरासरी तीन लाख ४० हजार असणारी दैनंदिन प्रवासी संख्या आता साडेतीन लाखांचा टप्पा पार करून पुढे गेली आहे.

अतिजलद, सुकर प्रवास आणि वक्तशीरपणामुळे मेट्रोकडे प्रवासी मोठ्या संख्येने वळत आहेत. तसेच पावसाचा परिणाम रेल्वेप्रमाणे मेट्रोवर होत नाही. पावसातही मेट्रो सेवा सुरळीत आणि अखंड सुरू असते. त्यामुळेही प्रवासी पावसाळ्यात मेट्रोला पसंती देत आहेत. त्यामुळेच मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या घटना घडतात. रेल्वे रुळांवरही पाणी साचते. त्यामुळे बेस्ट आणि रेल्वेचा वेग मंदावतो, सेवा विस्कळीत होते. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी चारही मेट्रो मार्गिकांवर काही अतिरिक्त मेट्रो गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रवासी संख्या वाढल्यास या अतिरिक्त गाड्या चालवल्या जातील, असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.