मुंबई : वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या प्रकल्पाच्या अंतर्गत मुलुंडमधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेने भाजपच्या विकासाची पोलखोल केली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरु असून स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. त्यामुळे तथाकथित विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ केली तर सरकारने या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

मुलुंडच्या एलबीएस मार्गावर घडलेल्या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात सुरु असून तो आता लोकांच्या जिवावर उठला आहे . मेट्रोची कामं लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? कामाचा दर्जा आणि सुरक्षेकडे सरकार बघणार आहे की नाही? हा प्रश्न असून फक्त कंत्राटदारावर कारवाई करुन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये. जसे श्रेय घेता तशी जबाबदारीही घेण्यास भाजप महायुती सरकारने शिकले पाहिजे.

कोस्टल रोड, मुंबई ट्रांस हार्बर लिंक रोड, समृद्धी महामार्ग या मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे बांधकाम किती तकलादू आहेत हे एका वर्षातच या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी दाखवून दिले आहे. हजारो, लाखो कोटी रुपये खर्च करून जर हे प्रकल्प जनतेसाठी जीवघेणे ठरत असतील तर असा विकास काय कामाचा? मुलुंडमध्ये मेट्रो कामाचे स्लॅब कोसळण्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका – आदित्य ठाकरे

बांधकामाधीन मेट्रो ४ मार्गाचा काँक्रीट स्लॅब (पॅरामेट) उंचावरून खाली एका रिक्षा आणि एका कारवर कोसळला. याचप्रमाणे गेल्या वर्षी एक भिंत कोसळली होती आणि तत्कालीन नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्ग ३ मध्ये पावसाचे पाणी भरले होते. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल का? कदाचित नाही. कदाचीत काही लाखांचा दंड दाखवेल आणि कंत्राटदारा आणखी निविदा देईल, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.