मुंबई : मुंबईतील म्हाडा वसाहतींसह उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आता कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारूपानुसार करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार पुनर्विकासाला वेग देण्यात आला असून म्हाडाकडून ११ पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आले होते. ११ पैकी ७ पुनर्विकास प्रकल्पापैकी तीन प्रकल्प निविदा प्रक्रियेत आहेत. तर चार प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या प्रकल्पांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

म्हाडाने आता मुंबईतील आणखी चार म्हाडा वसाहतींचा सी अँड डी प्रारूपानुसार पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यात खार येथील रामकृष्ण नगर बोरिवलीतील जुनी म्हाडा वसाहत, गोराई म्हाडा वसाहत आणि चारकोप म्हाडा वसाहतीचा समावेश आहे. या चार म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव महिन्याभरात राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. या चार प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईत एकूण ११ पुनर्विकास प्रकल्प राबविले जाणार आहेत. या ११ पुनर्विकासाच्या माध्यमातून एकूण ९२३ एकर जागेचा पुनर्विकास होणार आहे, तर या पुनर्विकासाच्या अंतर्गत येत्या आठ ते दहा वर्षांत ७५ हजार रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचवेळी या पुनर्विकासातून म्हाडाला सोडतीसाठी मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होणार आहेत.

मुंबई मंडळाच्या अभिन्यासातील अनेक महाडा वसाहतींची दुरवस्था झाली असून त्यांचा तातडीने पुनर्विकास करणे गरजेचे आहे. मात्र विविध कारणांमुळे म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास रखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता म्हाडाने पुढाकार घेऊन म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून आणि सी अँड डी प्रारूपानुसार पुनर्विकास मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. सी अँड डी प्रारूपानुसार पहिला पुनर्विकास गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीचा केला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पार पडली असून १४३ एकरावरील मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी समूहाच्या माध्यमातून केला जात आहे.

कामाठीपुराच्या पुनर्विकासाला लवकरच सुरुवात

दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसराचा पुनर्विकासही सी अँड डी प्रारूपानुसार केला जाणार असून यासाठीही कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ३४ एकरावरील कामाठीपुराच्या पुनर्विकासाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. कामाठीपुरा पुनर्विकासात उपकर प्राप्त इमारतींसह इतर इमारतींचा समावेश आहे. काळाचौकीतील ३३ एकरावरील अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

या प्रकल्पांसाठी निविदा जारी

अंदाजे ६ एकरावरील जोगेश्वरी, पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासही सी अँड डी प्रारूपानुसार केला जाणार आहे. या प्रकल्पाचे कंत्राट बी. जी. शिर्के समूहाला देण्यात आले आहे. या पुनर्विकासाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. वांद्रे रेक्लेमशन येथील ९९ एकरवरील म्हाडा वसाहतीच्या, वरळीतील ३४ एकरवरील आदर्श नगर आणि अंधेरीतील अंदाजे ७३ एकरावरील सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या पुनर्विकासासाठी नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत.

मोतीलाल नगर, कामाठीपुरा, अभुदय नगर, जोगेश्वरी पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तर आता मुंबईतील आणखी चार म्हाडा वसाहतीचा सीआयडी प्रारूपानुसार पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. बोरिवलीतील २६ एकरावरील जुनी म्हाडा वसाहत, चारकोपमधील २०० एकरवरील म्हाडा वसाहतीसह गोराईतील २५० एकरावरील म्हाडा वसाहतीचा आणि खारमधील ६ एकरावरील रामकृष्ण नगर अशा चार वसाहतीचा यात समावेश आहे. या चार प्रकल्पांचा प्रस्ताव महिन्याभरात राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. या प्रकल्पास मान्यता मिळाल्यास मुंबईत एकूण ११ पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागतील. हे ९२३ एकरावरील प्रकल्प असणार आहेत. या ११ प्रकल्पाद्वारे ७५ हजार रहिवाशांचे पुनर्वसन करून त्यांना मोठी हक्काची घरे दिली जाणार असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले. हे ११ प्रकल्प येत्या ८ ते १० वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.