मुंबई : मुंबईतील तीन महत्त्वाच्या अशा आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन आणि सरदार वल्लभाई पटेल नगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा मागविल्या आहेत. त्यानुसार निविदा सादर करण्याची मुदत ११ मे रोजी संपुष्टात येणार होती. मात्र त्याआधीच मुंबई मंडळाने निविदा प्रक्रियेला आठवड्याभराची मुदतवाढ दिली.आता इच्छुक कंपन्या, विकासकांना १८ मेपर्यंत निविदा सादर करता येणार आहे. त्यानंतर निविदा खुल्या केल्या जातील.
म्हणून मुदतवाढ…
मोतीलाल नगरच्या धर्तीवर वरळीतील आदर्शनगर, वांद्रे पश्चिम येथील वांद्रे रेक्लमेशन आणि अंधेरी सरदार वल्लभभाई पटेल नगरचा पुनर्विकास कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेन्ट एजन्सी (सी अँड डी) प्रारूपानुसार अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करून करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. यासंबंधीच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावास राज्य सरकारने हिरवा कंदिल दिल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंडळाने या तिन्ही पुनर्विकासासाठी स्वतंत्र निविदा मागविल्या. त्यानुसार इच्छुक कंपन्या, विकासकांना ११ मेपर्यंत निविदा सादर करता येणार होत्या.
मात्र निविदा पूर्वबैठकीत इच्छुक कंपन्या, विकासकांनी निविदेस मुदतवाढ देण्याची मागणी केली. निविदेसंदर्भात त्यांच्या काही शंका होत्या. त्या शंकाचे निराकरण करून त्यांना निविदा सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक होते. त्यामुळे निविदेला आठवड्याभराची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
मुदतवाढीनुसार आता इच्छुक विकासक, कंपन्यांना १८ मेपर्यंत निविदा सादर करता येणार आहे. त्यानंतर तांत्रिक निविदा आणि पुढे आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम कोणाला मिळते याकडे रहिवाशांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या तिन्ही प्रकल्पांसाठी बड्या कंपन्या, विकासक उत्सूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आदर्श नगर पुनर्विकासाअंतर्गत ८६३ सदनिकाधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या सदनिकाधारकांना ८०० ते २५०० चौरस फुटांची घरे उपलब्ध होणार आहेत. वांद्रे रेक्लमेशनमधील ४ हजारांहून अधिक सदनिकाधारकांचे पुनर्वसन केले जाणार असून या सदनिकाधारकांना ९२४ ते २३५० चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. त्याच वेळी सरदार वल्लभभाई पटेल नगर पुनर्विकासाच्या माध्यमातून ४९७३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार असून येथील रहिवाशांना ६८६ ते २२८० चौरस फुटांची घरे मिळणार आहे.
या तिन्ही पुनर्विकासातून मुंबई मंडळाला मोठ्या संख्येने अतिरिक्त घरे उपलब्ध होतील. ही घरे सोडतीद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध करण्यात येतील. या पुनर्विकासातून मंडळाला ५ हजार कोटींहून अधिक महसूल मिळणार आहे.
