मुंबई : शीव, प्रतीक्षा नगर येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिराचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळाच्या माध्यमातून हा पुनर्विकास केला जाणार असून हा पुनर्विकास कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारूपाऐवजी कंत्राटदाराची नियुक्ती करून स्वतः करण्याचा निर्णय आता म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम मंडळाकडून सुरू असून महिन्याभरात प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. या पुनर्विकासाअंतर्गत संक्रमण शिबिरातील ९५ इमारतींचा पुनर्विकास केला जाणार असून यात ६३८७ संक्रमण शिबिरासाठी गाळे बांधण्यात येणार आहेत.

मुंबईतील रखडलेल्या म्हाडा वसाहतींसह जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आता समूह पुनर्विकासाअंतर्गत करण्याचे धोरण म्हाडाने स्वीकारले आहे. त्यानुसार मुंबईतील ९०० एकरांहून अधिक क्षेत्रावरील म्हाडा वसाहतींचा आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ प्रकल्पांद्वारे अंदाजे ६५ हजार रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, आदर्श नगर, कामाठीपुरा, गोराई, बोरिवली आदी वसाहतींचा यात समावेश आहे.

११ प्रकल्प सी अँड डी प्रारूपानुसार राबविले जाणार आहेत. तर उमरखाडीचाही समूह पुनर्विकास केला जाणार असून हा पुनर्विकास स्वतः म्हाडा करणार आहे. उपकरप्राप्त इमारती आणि म्हाडा वसाहतींपाठोपाठ आता म्हाडाने जुन्या संक्रमण शिबिराचाही समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रतीक्षा नगरमधील धोकादायक स्थितीत असलेल्या संक्रमण शिबिराच्या ९५ इमारतींचाही समूह पुनर्विकास केला जाणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.

प्रतीक्षा नगरमधील संक्रमण शिबिराचा समूह पुनर्विकास सी अँड डी प्रारूपानुसार करायचा की स्वतः म्हाडाच्या माध्यमातून करायचा याची व्यवहार्यता तपासणी मंडळाकडून सुरू होती. ही व्यवहार्यता तपासणी पूर्ण झाली असून आता म्हाडा स्वतः हा पुनर्विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील संक्रमण शिबिराच्या ९५ इमारतींचा पुनर्विकास केला जाणार असून या इमारतींमध्ये सध्या ६३८७ शिबिरार्थी वास्तव्यास आहेत. तर यात अ, ब, क वर्गातील शिबिरार्थींचा समावेश असून पुनर्वसित इमारतींमध्ये या सर्व संक्रमण शिबिरार्थींसाठी ६३८७ घरे

बांधण्यात येणार आहेत. तर अ वर्गातील शिबिरार्थीला अर्थात मूळ भाडेकरूला कायमस्वरूपी मालकी हक्काचे घर पुनर्विकासाअंतर्गत दिले जाणार आहे. तर ब आणि क वर्गातील शिबिरार्थींना अर्थात खरेदी-विक्री केलेल्या आणि घुसखोरांना तात्पुरत्या स्वरूपात पुनर्विकासाअंतर्गत घरे दिली जाणार आहेत. यांच्या कायमस्वरूपी घरांबाबत प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. तेव्हा न्यायालयाचा जो काही निर्णय येईल, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

शिबिरार्थींच्या पुनर्वसनाशिवाय या पुनर्विकासातून म्हाडाला अतिरिक्त घरेही उपलब्ध होणार आहेत. ही घरे नेमकी किती असतील हे निविदा प्रक्रियेदरम्यानच स्पष्ट होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून महिन्याभरात प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल. सरकारची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा आराखडा तयार करून त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवित प्रकल्प मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले.