मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर आता मुंबईतील आणखी चार म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार बोरिवलीतील जुनी म्हाडा वसाहत, चारकोप म्हाडा वसाहत, गोराई म्हाडा वसाहत आणि खारमधील रामकृष्ण नगर म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी’ (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करून केला जाणार आहे. या चारही वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव महिन्याभरात राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. या पुनर्विकासांतर्गत ४५ हजारांहून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन करून त्यांना उत्तुंग इमारतीतील मोठी घरे दिली जाणार आहेत.

कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट प्रारूप कशासाठी ?

मुंबई मंडळाच्या अभिन्यासातील म्हाडा वसाहतीतील इमारती जुन्या झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींचा शक्य तितक्या लवकर पुनर्विकास करणे आवश्यक आहे. त्यानुसार इमारतींचा पुनर्विकास होतो आहे. मात्र, स्वतंत्र इमारतींचा पुनर्विकास होत असल्याने रहिवाशांना मोठी घरे मिळत नसून त्यांना रस्त्यांसह इतर सुविधाही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे समूह पुनर्विकासाला प्राधान्य देणे आवश्यक ठरले आहे. अशावेळी समूह पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक निधी नसल्याने म्हाडाने मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी सी अँड डी प्रारूप आणले आहे.

या प्रारूपानुसार खासगी विकासकाची नियुक्ती करून पुनर्विकास मार्गी लावला जाणार आहे. तर विक्री घटकातील क्षेत्रापैकी जो कोणी म्हाडाला अधिक हिस्सा देईल अशा विकासकाची नियुक्ती केली जात आहे. त्यानुसार मोतीलाल नगर, कामाठीपुरा, आदर्श नगर, अभ्युदय नगर, वांद्रे रेक्लमेशन, पीएमजीपी (जोगेश्वरी), सरदार वल्लभभाई पटेल नगर या वसाहतींचा पुनर्विकास सी अँड डीनुसार केला जात आहे. यातील काही प्रकल्पांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तर काही प्रकल्पांसाठी नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत. आता या प्रकल्पांमध्ये आणखी चार प्रकल्पांची भर पडणार आहे.

गोराई, चारकोप सर्वात मोठे प्रकल्प

मुंबई मंडळाने मुंबईतील आणखी चार म्हाडा वसाहतींचा मोतीलाल नगरच्या धर्तीवर सी अँड डी अंतर्गत पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. बोरिवलीतील जुनी म्हाडा वसाहत, चारकोप म्हाडा वसाहत, गोराई म्हाडा वसाहत आणि खारमधील रामकृष्ण नगर म्हाडा वसाहतींचा यात समावेश आहे. रामकृष्ण नगर वसाहत ६ एकरवर, जुनी म्हाडा वसाहत, बोरिवली २६ एकरवर, चारकोप म्हाडा वसाहत २०० एकरवर तर गोराई म्हाडा वसाहत २५० एकरवर वसली आहे.

चारकोप आणि गोराई वसाहतीत २० ते २२ हजार सदनिकाधारक आहेत. तर उर्वरित दोन ठिकाणच्या सदनिकाधारकांची संख्या प्राप्त झालेली नाही. मात्र, या चार वसाहतींच्या पुनर्विकासाद्वारे ४५ हजारांहून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना मोठी घरे दिली जाणार आहेत. जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण नगरमधील रहिवासी सध्या ३८७ ते ५०५ चौ. फुटांच्या घरात राहतात; त्यांना ८८२ ते ११२० चौ. फुटांची घरे मिळतील. तर जुनी म्हाडा वसाहत, बोरिवलीतील रहिवाशांना २५०-४५० चौ. फुटांच्या घराऐवजी ४९० ते ८२५ चौ. फुटांची घरे, गोराईतील रहिवाशांना २५०-९०० चौ. फुटांच्या घराऐवजी ५०० ते १८०० चौ. फुटांची घरे आणि चारकोपमधील रहिवाशांना २५०-१००० चौ. फुटांच्या घरांऐवजी ५०० ते १००० चौ. फुटांची घरे मिळतील.

प्रस्ताव लवकरच सरकारकडे पाठवणार

या चारही वसाहतींच्या सी अँड डी पुनर्विकासाचा प्रस्ताव महिन्याभरात राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर विकासकाची नियुक्ती करून पुनर्विकास मार्गी लावला जाईल. दरम्यान, विकासकाची नियुक्ती झाल्यानंतर त्याने आराखडा तयार केल्यास पुनर्विकास नेमका कसा होणार हे स्पष्ट होईल.