मुंबई : गिरणी कामगारांसाठी मुंबईतच घरे देऊ, अशी राज्य शासनाने कितीही वल्गना केली तरी प्रत्यक्षात मुंबईत गिरणी कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या भूखंडावर फक्त दोन हजार ७०८ घरे बांधता येणार आहेत. त्यापैकी फक्त १६१ घरांचे बांधकाम सध्या सुरु आहे. पाच गिरण्यांमधील लहान आकाराच्या भूखंडांपोटी मोठा भूखंड महापालिकेने दिला असला तरी या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे चार वर्षांपासून प्रलंबित आहे.
मुंबईतील ५८ गिरण्यांमध्ये ३२ खासगी तर २५ राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या आणि एक मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन (एमएसटीसी) च्या अखत्यारीत येते. यापैकी ११ गिरण्यांच्या पुनर्विकास प्रस्तावांना महापालिकेने मंजुरी दिलेली नसल्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) वाटा निश्चित झालेला नाही. उर्वरित ४७ गिरण्यांपैकी दहा गिरण्यांमध्ये नव्या विकास नियंत्रण नियमावली २०३४ नुसार म्हाडाचा वाटा निरंक आहे. ३७ गिरण्यांपैकी ३३ गिरण्यांमधील ३४.४५ एकर भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा म्हाडाला प्राप्त झाला आहे. त्यापैकी २६ गिरण्यांच्या भूखंडावर १३ हजार ४५३ घरांचे बांधकाम करण्यात आले आहे.
सध्या न्यू ग्रेट ईस्टर्न (भायखळा) गिरणीच्या जागेवर ९६ घरे आणि ४८ संक्रमण सदनिकांचे तर हिंदुस्थान प्रोसेस (प्रभादेवी) गिरणीच्या जागेवर ६५ घरे आणि ३२ संक्रमण सदनिकांचे काम सुरु आहे. मातुल्य, मफतलाल युनिट तीन, हिंदुस्थान युनिट एक, दोन व तीन, व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न इंडिया या पाच गिरण्यांतील म्हाडाच्या वाट्याला आलेले भूखंड आकाराने लहान असल्यामुळे ते एकत्रित करण्यात आले. या बदल्यात वेस्टर्न इंडिया या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या भूखंडापैकी तीन हजार ६०७ चौरस मीटर भूखंड म्हाडाला देण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली. या भूखंडाचा ताबा म्हाडाने घेतला असला तरी या भूखंडावर मनोरंजन मैदानाचे आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षण उठविण्यासाठी म्हाडाने २०२१ मध्ये नगरविकास विभागाला प्रस्तावा सादर केला. त्यानंतर पुन्हा २०२३ मध्ये स्मरणपत्रही पाठविले. तरीही नगरविकास विभागाने आरक्षण रद्द केलेले नाही. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी ३८५ घरे आणि १९२ संक्रमण सदनिकांचे काम म्हाडाला सुरु करता आलेले नाही.
याशिवाय इंडिया युनायटेड क्रमांक ४, जाम, मधुसुदन आणि सिताराम या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अखत्यारीतील गिरण्यांचा सुमारे दहा हजार १९२ चौरस मीटर भूखंडाचा ताबा म्हाडाला अद्याप मिळालेला नाही. या भूखंडावर ९८६ घरे आणि ४९० संक्रमण सदनिका बांधल्या जाणार आहेत. याआधी वस्त्रोद्योग महामंडळाच्या आठ गिरण्यांच्या भूखंडावर ७०४ घरे आणि ३५२ संक्रमण सदनिका तसेच सेंच्युरी मिलच्या शिल्लक राहिलेल्या जागेवर ४७४ घरे आणि २३६ संक्रमण सदनिका बांधल्या जाणार आहेत.
गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरे तातडीने बांधता यावीत, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय मुंबई महानगर परिसरातही गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणसाठी योजना राबविण्यात येणार आहे – संजीव जायस्वाल, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा.
- पुनर्विकासाला मंजुरी नसल्याने वाटा प्रलंबित असलेल्या ११ गिरण्या : दिग्विजय, फिनले, गोल्डमोहर, इंडिया युनायटेड नंबर एक, पाच आणि सहा, न्यू सिटी, पोदार प्रोसेसर (एडवर्ड), टाटा (सर्व राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ), ब्रॅडबरी आणि रघुवंशी.
- शून्य वाटा मिळालेल्या दहा गिरण्या : मॉडर्न, कमला, खटाव (भायखळा), फिनिक्स, कोहिनूर मिल नंबर एक व दोन, पोदार, मफतलाल मिल नंबर एक व दोन आणि मुकेश टेक्सटाईल.
