मुंबई: पूर्व वैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाने १४ वर्षीय मुलाला विहिरीत ढकलून त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी देवनार परिसरात घडली. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बैंगनवाडी परिसरात वास्तव्यास असलेला हफिस शेख (१४) देवनार गाव परिसरातील टेलिकॉम कंपनीजवळील झुडपांमध्ये खेकडे पकडण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. या परिसरात एक जुनी विहीर असून या विहिरीजवळ सर्वजण खेकडे पकडत होते. याच वेळी अल्पवयीन आरोपीने हफिस याला धक्का देऊन विहिरीत ढकलले. हफिसला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हफिसच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
