मुंबई : मिठी नदीतून गाळ काढण्याची कार्यवाही सुरू असून त्या कामात कंत्राटदाराकडून फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नगरसेविका सईदा खान यांनी बुधवारी स्थायी समितीच्या सभेत केला. मिठी नदीलगतच्या परिसरात राडारोड्याची अवैध विल्हेवाट लावली जाते. हा प्रकार माहीत असूनही कंत्राटदार राडारोड्यावर गाळ टाकून गैरप्रकार उघडकीस येण्यापासून रोखत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
गाळ काढण्याच्या कामातील अनियमितता व गैरप्रकारांमुळे मिठी नदीचा विषय कायमच चर्चेत असतो. यापूर्वीही आर्थिक अनियमितता आणि फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नुकतेच मिठी नदीतून गाळ उपसण्याच्या कामासाठी अननुभवी कंत्राटदारांची नेमणूक केल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. संबंधित कंत्राटदारांकडून दर्जेदार काम होईल का, याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी स्थायी समितीच्या सभेत सईदा खान यांनी मिठी नदीबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत त्यातील गैरव्यवहार पुरव्यांसहित सादर केले.
नदीलगतच्या भागात रात्रीच्या वेळी राडारोडा टाकला जातो. त्यानंतर कंत्राटदार नदीतून काढलेला गाळ त्यावर टाकतो. गाळाने राडारोडा झाकल्यानंतर दोन्हींची एकत्रित विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे प्रत्यक्षात किती गाळ काढला जातो, याबाबत शंका निर्माण होते, असे खान म्हणाल्या. कंत्राटदाराकडून होत असलेल्या या फसवणुकीविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या कामात मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय होत असून त्यावर तातडीने नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. दर आठवड्याला गाळ काढल्याचे आकडे दिले जात असले तरी तो खरोखर नदीतील गाळच असल्याबाबत शंका आहे. यासंदर्भातील काही छायाचित्र व चित्रफिती संबंधितांकडे पाठवले असल्याचे खान यांनी स्पष्ट केले.
तसेच, या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, सॅटेलाईट आणि उपग्रहांच्या माध्यमातून देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रत्येक वर्षी पूरस्थिती निर्माण होते, विशेषतः कुर्ला आणि आसपासच्या भागांत नागरिकांना मोठा फटका बसतो. त्यामुळे या कामांमध्ये पारदर्शकता आणि काटेकोर देखरेख आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूर्वीही मिठी नदीतील गैरप्रकाराबाबत अनेक वेळा आरोप झाले आहेत. अनेक नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, अद्यापही कामात हलगर्जीपणा, फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत असल्याने मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
