मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ मार्गिकेवरील बांगूर नगर रेल्वे स्थानकावर मेट्रो गाडी थांबली असताना गाडीचे दरवाजे बंद होऊन गाडी निघणार असतानाच दोन वर्षाचा एक मुलगा अचानक गाडी बाहेर आला. हा मुलगा बाहेर आल्यानंतर स्थानकावरील संरक्षित दरवाजेही बंद झाले आणि मुलगा बाहेरच राहिला. रविवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेच्यावेळी स्थानकात असलेल्या महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या (एमएमएमओपीएल) कर्मचाऱ्याच्या सर्तकेतमुळे मुलगा सुरक्षितपणे गाडीत पोहचला.
रविवारी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान मेट्रो २ अ मार्गिकेवरील बांगूर नगर मेट्रो स्थानकावर ही घटना घडली. स्थानकामध्ये आलेली मेट्रो गाडी थांबली. गाडीचे दरवाजे उघडल्यानंतर दोन वर्षांचा मुलगा एकटाच गाडीच्या बाहेर पडला आणि स्थानकावर असलेल्या दरवाज्याच्याही बाहेर आला. काही क्षणातच मेट्रो गाडीचे आणि स्थानकाबाहेर दरवाजे बंद झाले.
मुलगा दरवाजा बाहेरच राहिला. कोणत्याही क्षणी मेट्रो गाडी सुटणार असतानाच स्थानकावरील एमएमएमओपीएलचे कर्मचारी संकेत चोडणकर यांनी या मुलाला पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता तडक धाव घेत ट्रेन ऑपरेटरला दरवाजा उघडण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनंतर काही क्षणात स्थानकावरील संरक्षित दरवाजे उघडले. त्यानंतर या मुलाला सुरक्षितपणे त्याच्या पालकांकडे सुपुर्द करण्यात आले आणि मग पुढे गाडी पुढील प्रवासास निघाली. चोडणकर यांच्या सतर्कतेमुळे मुलगा सुरक्षितपणे आईवडिलांपर्यंत पोहचला, त्यामुळे संकेत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.