मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) परवडणार्या घरांची मागणी अधिक असताना विकासकांकडून महागड्या घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. दुसरीकडे मागणी नसतानाही मोठ्या संख्येने नवीन प्रकल्प हाती घेतले जात असल्याने एमएमआरमध्ये २ लाख ८८ हजार ८५० घरे विक्रीविना पडून आहेत. एकीकडे परवडणार्या घरांची मागणी असताना याची निर्मिती होत नसल्याचे चित्र आहे.
मुंबईत झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून मुंबईसह एमएमआरमध्ये मोठ्या संख्येने परवडणार्या घरांची गरज आहे. खासगी विकासकांकडून महागडी, पंचतारांकित सुविधांनी सुसज्ज घरे बांधली जात आहेत. बांधकाम व्यवसायातील आघाडीचे हिरानंदानी समूहाचे सर्वेसर्वा निरंजन हिरानंदानी यांनी काही दिवसांपूर्वीच परवडणार्या घरांच्या निर्मितीत मागील २० वर्षांत मोठी घसरण झाल्याचा मुद्दा उपस्थित करून चिंता व्यक्त केली होती. आता लिआस फोरस या रिअल इस्टेट रेटिंग संस्थेच्या २०२५-२६ मधील अहवालाने ही चिंता वाढवली आहे. परवडणार्या घरांसाठी धिक मागणी असतानाही एमएमआरमध्ये २ लाख ८८ हजार ८५० घरे विक्रीवाचून पडून असल्याचे लिआस फोरसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एमएमआर परिसरात २०२५ मध्ये १ लाख ४५ हजार ५९२ घरांची निर्मिती झाली. तर २०२६ मध्ये १ लाख २९ हजार ५५६ नवीन घरे बांधण्यात येणार आहेत. एमएमआर परिसरात २०२५ मध्ये १ लाख ६२ हजार ६४ घरांची विक्री झाली, तर २०२६ मध्येही दीड लाखांहून अधिक घरांची विक्री होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी लिआस फोरसच्या अहवालानुसार एमएमआर परिसरात २०२५ मध्ये ३ लाख ५ हजार ५६४ घरे विक्रीवाचून होती. तर २०२६ मध्येही चित्र बदलले नसून आजही २ लाख ८८ हजार ८५० घरे विक्रीविना आहेत.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज मोठ्या संख्येने पुनर्विकास, समूह पुनर्विकास सुरू असल्याने नवीन घरांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आदी परिसरात मोठ्या संख्येने खासगी विकासकांकडून घरांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे एकीकडे घरांची विक्री होत असली तरी दुसरीकडे मोठ्या संख्येने घरे विक्रीवाचून पडल्याचे चित्र असल्याचे लिआस फोरस संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर यांनी सांगितले. ही घरे विकण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.
एमएमआरमध्ये घरे विनाविक्री पडून असल्याची बाब चिंताजनक असली तरी हे मंदीचे द्योतक नाही. देशातील सर्वाधिक घरांची निर्मिती एमएमआरमध्ये होते आणि निर्मितीतील घरे बांधकामाच्या विविध टप्प्यांमध्ये असतात. त्यामुळे विनाविक्री असलेली घरेही येत्या काही वर्षांत विकली जातील, असे क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष सुखराज नाहर यांनी स्पष्ट केले.
घरे रिक्त राहण्यामागे मागणीचा अभाव हे कारण नाही, तर घरांच्या किमती आणि ग्राहकांची खरेदी क्षमता यामधील तफावत हे मुख्य कारण आहे. एमएमआरमध्ये परवडणार्या घरांची मागणी आहे. मात्र तशा घरांची निर्मिती होत नाही. – सुखराज नाहर, अध्यक्ष, क्रेडाई-एमसीएचआय
पुण्यातही लाखभर घरांना ग्राहकांची प्रतीक्षा
अहवालानुसार देशभरात ११ लाख ९९ हजार ६८७ घरे विक्रीविना पडून आहेत. यातील सर्वाधिक घरे एमएमआरमधील असून एमएमआरपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक घरे विक्रीवाचून रिक्त असल्याचे अहवालात नमूद आहे. २०२५ मध्ये पुण्यात ८९ हजार ८५३ घरे विक्रीविना रिक्त होती. त्यात २०२६ मध्ये वाढ झाली असून ही संख्या १ लाख २ हजार १३४ वर पोहोचली आहे.
