मुंबई : मुलुंड येथील मेट्रो-४ मार्गिकेच्या कामादरम्यान झालेली दुर्घटना ताजीच असताना आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वरळी-शिवडी उन्नत रस्त्याच्या कामादरम्यान एक सळई उंचावरून खाली कोसळल्याने पादचारी जखमी झाला. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत तरुणाच्या डोक्याला मार लागला. या घटनेमुळे प्रकल्पांच्या कामादरम्यानचा ‘एमएमआरडीए’ची हलगर्जी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दक्षिण मुंबईतून अटल सेतूवर अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीए वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परळ येथील वाडिया रुग्णालयानजीक खांबांसाठी लोखंडी सळ्या बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी अचानक एक सळई उंचावरून खाली कोसळून खालून जाणार्‍या पादचारी तरुणाच्या डोक्यावर पडली. या तरुणाला तात्काळ नजीकच्या केईएम रुग्णालय, नंतर परळ येथील ग्लेन ईगल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे एमएमआरडीएच्या कामादरम्यानच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

इमारतीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू, पाच जखमी

मुंबई : चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चेंबूर सुभाष नगर परिसरातील इमारत क्र. ३६ च्या पुनर्विकासाचे काम आदिराज डेव्हलपर या विकासकाकडून सुरू आहे. शनिवारी सकाळी सहा कामगार आठव्या मजल्यावर बांधलेल्या परांचीवर काम करत होते. त्याच वेळी परांची तुटल्याने सहा जण खाली पडले. अग्निशमन दल आणि चेंबूर पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल केले. यात रामनजेनेल्लु हणुमंता देशपोगु (५६) याचा मृत्यू झाला आहे. तर गुणधर राय (२२), कुस रॉय (३०), रमेश रॉय (२५), विजय मौर्या (३५), संदीप रॉय (२७) हे जखमी झाले.