मुंबई : मुलुंड मेट्रो ४ (वडाळा – ठाणे – कासारवडवली) मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेची घटना ताजी असतानाच आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कामादरम्यान पुन्हा अपघात झाला. वरळी – शिवडी उन्नत रस्त्याच्या कामादरम्यान एक सळई उंचावरून खाली कोसळली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरूणाच्या डोक्यावर आदळली. या दुर्घटनेत तरूणाच्या डोक्याला मार लागला. तरूणावर ग्लेन ईगल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे एमएमआरडीएच्या प्रकल्पाच्या कामादरम्यान कंत्राटदार, सल्लागार आणि अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा सुरूच असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
दक्षिण मुंबईतून अटल सेतूवर अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीए वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधत आहे. अनेक कारणांमुळे या प्रकल्पाच्या पूर्णत्वास विलंब झाला आहे. पण आता मात्र काही महिन्यातच हा प्रकल्प पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार कामाला वेग देण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास परळ येथील वाडीया रूग्णालयानजीक खांबांसाठी लोखंडी सळ्या बसविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक एक सळई उंचावरून खाली कोसळली. तेथून जात असलेल्या एका तरूणाच्या डोक्यावर सळई पडली आणि त्यात तो जखमी झाला. जखमी तरूणाला तात्काळ नजीकच्या केईएम रूग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असताना एमएमआरडीएने जखमी तरूणाला परळ येथील ग्लेन ईगल्स रुग्णालयात हलविले. या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
दोन आठवड्यांपूर्वी, १४ फेब्रुवारीला मुलुंड येथे मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान सिमेंटचा वजनदार कठडा पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएच्या निष्काळजीपणावर प्रचंड टीका झाली. या टीकेनंतर जाग आलेल्या एमएमआरडीएने तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निलंबित केले. सल्लागाराची हकालपट्टी केली. कंत्राटदाराविरोधात दंडात्मक कारवाई केली. पाच जणांवर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटक झाली. मात्र एमएमआरडीएच्या कामादरम्यानच्या सुरक्षिततेचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला. एमएमआरडीएने कामादरम्यान सुरक्षिततेची सर्व काळजी घेतली जाईल, असे आश्वासित केले होते. हे आश्वासन देऊन काही दिवस होत नाही तोच शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) पुन्हा कामादरम्यानचा निष्काळजीपणा समोर आला. शुक्रवारच्या दुर्घटनेत तरूण थोडक्यात बचावला, पण आता नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
जे. कुमारला पुन्हा अभय, केवळ कारणे दाखवा नोटीस
वरळी – शिवडी उन्नत मार्गाचे काम मेसर्स जे. कुमार कंपनीकडे असून या कंपनीकडून कामादरम्यान सातत्याने निष्काळजीपणा होत आहे. मेट्रो ९ (दहिसर ते मीरा-भाईंदर) मार्गिकेचे कामही याच कंत्राटदाराकडे असून या मार्गिकेच्या कामादरम्यान अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. या अपघातात सात जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बीकेसीतील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान गर्डरचा कोसळला होता, त्यात अनेक जण जखम झाले होते. या सर्व अपघातांसाठी जे. कुमारावर केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली वा चौकशी करण्यात आली. त्याच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई अद्याप झालेली नाही. दरम्यान, मेट्रोच्या कामात विलंब, मेट्रो ३ च्या कामातील हलगर्जीपणामुळे स्थानकात पाणी साचणे असे प्रकारही याच कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे झाले होते. त्याप्रकरणीही केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर आता शुक्रवारच्या घटनेप्रकरणी जे. कुमारला केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सल्लागार कंपनी मेसर्स एसटीयूपी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, जखमी तरूणाच्या वैद्यकिय उपचाराचा सर्व खर्च एमएमआरडीए करीत असल्याचे एमएमआरडीएने सांगितले.
