मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका पुन्हा सेवेत दाखल करण्याचा मार्ग अखेर आता मोकळा झाला आहे, कारण या प्रकल्पास अखेर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मोनोरेल संचालनासाठीची ही अंतिम प्रक्रिया असून ती पूर्ण झाल्याने आता लवकरच मोनोरेल कित्येक महिन्यांनंतर सेवेत दाखल होईल. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने मोनोरेलच्या संचालनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असून ती २५ जूननंतर संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच मोनोरेल सेवेत दाखल होणार असून मोनोरेलने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जूनअखेरपर्यंत वा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मोनोरेल सुरुवातीपासूनच वादात मुंबईतीलच नव्हे, तर देशातील एकमेव अशी मोनोरेल चेंबूर ते जेकब सर्कल मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून वादात अडकलेली आहे. या मार्गिकेस प्रतिसाद मिळत नसल्याने मार्गिका तोट्यात असून या प्रकल्पावर टीका होत आहे. तर दुसरीकडे या मार्गिकेवर सेवा सुरू झाल्यापासून अपघातांची, दुर्घटनांची मालिका सुरू असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, तरीही मोनोरेलची सेवा सुरू ठेवणे आवश्यक असल्याने एमएमआरडीएकडून तोट्यात सुरू असलेली मार्गिकेची सेवा सुरू आहे. दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये या मार्गिकेवर एकाच दिवशी दोन मोठे अपघात घडले. दोन गाड्या अतिवजनामुळे कलंडल्या. एका गाडीतील प्रवाशांना मोनोरेल गाडीच्या काचा, दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. ही घटना ताजी असताना काही दिवसांनी पुन्हा या मार्गिकेवर अपघात झाला. त्यानंतर मात्र या सेवेवर टीकेची झोड उठली आणि अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले. सेवा बंद करून संपूर्ण मार्गिकेचे, प्रणालीचे, गाड्यांचे अत्याधुनिकीकरण करून सुरक्षित अशी मोनोरेल सेवा देण्याचा निर्णय घेत तशी प्रक्रिया सुरू केली.
मोनोरेल प्रकल्पाचे अत्याधुनिकीकरण नुकतेच पूर्ण झाले असून सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. तर सीएमआरएस चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. सीएमआरएस चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मोनोरेल सेवेत दाखल केली जाणार होती. त्यानुसार एमएमआरडीएला सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपली असून अखेर एमएमआरडीएला मोनोरेल मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मोनोरेल संचालनासाठीची शेवटची प्रक्रिया पूर्ण झाल्याने मोनोरेल सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे एमएमआरडीएला २५ जूनपर्यंत मोनोरेल सेवेत दाखल करता येणार नाही. त्यामुळे मोनोरेलने पुन्हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जूनअखेर वा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
