मुंबई : चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मोनोरेल सेवा बंद होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे, तरी मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल होण्याची चिन्हे नाहीत. आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेलच्या उन्नत मार्गिकेत मोकळी जागा असल्याने उंचावरून गाडीचा भाग कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करत आता मार्गिकेच्या खाली संरक्षित जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी लागणारा अवधी लक्षात घेता आता मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्यासाठी एमएमआरडीएकडून दिवाळीचा मुहूर्त देण्यात आला आहे. दिवाळीदरम्यान मोनोरेल पुन्हा मुंबईत धावण्याची शक्यता आहे.

देशातील पहिली आणि एकमेव अशी चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका सुरुवातीपासून वादात अडकली आहे. सुरुवातीला प्रवासी संख्या नसल्याने तोट्यात असलेल्या मार्गिकेवर टीका होत होती, त्यानंतर या मार्गिकेवर सातत्याने अपघात, दुर्घटना होऊ लागल्याने मार्गिका वादात अडकली. मोनोरेल सातत्याने बंद पडणे, आगीमुळे मोनोरेल तब्बल ९ महिने बंद राहणे, अशा घटना याआधी घडल्या आहेत. तर २०२५ मध्ये दोन मोनोरेल गाड्या अतिवजनामुळे बंद पडल्या आणि एका दिशेला कलंडल्या. एका गाडीचा दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याची वेळ आली. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा मोनोरेल बंद पडली.

यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आणि एमएमआरडीएने २० सप्टेंबर २०२५ पासून मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली. त्यानंतर मोनोरेल प्रकल्पाचे अत्याधुनिकीकरण हाती घेतले. आता अत्याधुनिकीकरण पूर्ण झाले असून या मार्गिकेला सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले. त्यामुळे ही मार्गिका आतापर्यंत पुन्हा सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र आता मोनोरेल प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल होऊन १२ वर्षे झाल्यानंतर जाग आली असून सुरक्षिततेचा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

मोनोरेल उन्नत मार्गिकेवरून धावते. त्या उन्नत मार्गिकांच्या मध्ये मोठी मोकळ जागा आहे. मोनोरेल धावताना उंचावरून काही पडले वा मोनोरेल गाड्यांचा कोणताही भाग पडला तर रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना, पादचाऱ्यांना इजा होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित करीत एमएमआरडीएने पुन्हा मोनोरेलत्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही तपासणी पूर्ण झाली असून आता मोकळ्या जागेत संरक्षित जाळ्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार असून हे काम पूर्ण करून दिवाळीदरम्यान मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल केली जाईल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.