Mumbai Monorail service resumption update: अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका लवकरच पुन्हा सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हालचालींना वेग दिला आहे. लवकरच निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल सुरक्षा (सीएमआरएस) अधिकाऱ्यांची स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने एमएमआरडीएच्या यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करून मोनोरेल मार्गिकेच्या सुरक्षा चाचण्या घेण्यात येणार आहेत. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल केली जाणार आहे. यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. या अनुषंगाने जून-जुलैमध्ये मोनोरेल सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

अपघातांच्या मालिकेमुळे सेवा बंद

मुंबईतीलच नाही तर देशातील एकमेव अशी मोनोरेल मार्गिका म्हणजे चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून निरनिराळ्या वादात अडकली आहे. प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मार्गिका तोट्यात आहे. दुसरीकडे गाड्यांची कमी संख्या, गाड्यांची दुरवस्था आणि सातत्याने होणारे अपघात, दुर्घटना यामुळे मोनोरेल प्रकल्पावर टीका होत आहे. मोनोरेल १९ ऑगस्ट २०२५ रोजी बंद पडली होती. मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्याची वेळ आली. त्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच असल्याने अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये एमएमआरडीएने मोनोरेल मार्गिकेवरील सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली. सेवा काही काळासाठी बंद करून मोनोरेल सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली. नवीन अत्याधुनिक मोनोरेल प्रणाली आणि अत्याधुनिक गाड्या सेवेत दाखल करून मोनोरेलची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मागील काही दिवसांपासून गाड्यांचे अत्याधुनिकीकरण सुरू असून गाड्यांच्या चाचण्याही सुरू आहेत. तर मोनोरेलच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यासाठी निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल सुरक्षा (सीएमआरएस) अधिकाऱ्यांची स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोनो-मेट्रो जोडणी

निवृत्त अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव अनेक दिवस मान्यतेच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आता या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

लवकरच निवृत्त सीएमआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून मार्गिकेच्या सुरक्षा चाचण्यांना सुरुवात केली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यानंतर मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी जून-जुलै उजाडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोनो – मेट्रो पादचारी पुलाने जोडणार

अंधेरी पश्चिम ते मंडाले, मेट्रो २ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा सेवेत दाखल झाला आहे. मात्र हा टप्पा केवळ पाच स्थानकांचा असून या टप्प्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे मोनोरेलकडे मुंबईकरांची नापसंती असल्याचेच चित्र आहे. अशावेळी या मेट्रो २ ब आणि मोनोरेलकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीएने या प्रकल्पांना एकमेकांशी पादचारी पुलाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून या स्थानकाला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन हे स्थानक दोन ते तीन महिन्यांत सेवेत दाखल केले जाणार आहे. तर दुसरीकडे चेंबूर मेट्रो स्थानक आणि व्हीएनपी आणि आरसी मार्ग जंक्शन मोनोरेल स्थानक पादचारी पुलाने जोडण्याचे काम सुरू आहे. ही जोडणी झाल्यास मोनोरेलमधून मेट्रोत आणि मेट्रोतून मोनोरेलमध्ये जाणे सोपे होणार आहे. जून-जुलैमध्ये मोनोरेल सेवेत दाखल होताना मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकही सेवेत दाखल होणार आहे.