मुंबई : मागील ११ महिन्यांपासून बंद असलेली चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका लवकरच नव्याने वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच या मार्गिकेसाठीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. मोनोरेल मार्गिकेच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्व चाचण्या झाल्या असून या मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे. मात्र, आता मोनोरेल ज्या उन्नत मार्गिकेवर धावते, त्या मार्गिकेत मोकळी जागा आहे. त्यामुळे उंचावरून गाडीचा कोणताही भाग वा इतर काहीही कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मार्गिकेची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोकळी जागा बंद करून गाड्यांचे संचालन करता येईल का, याचा विचार यावेळी केला जाणार आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये एमएमआरडीएने मोनोरेलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली. तर मोनोरेल प्रकल्पाचे पूर्णतः अत्याधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली. जेणेकरून यापुढे कोणतीही दुर्घटना वा अपघात घडू नयेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच अत्याधुनिकीकरणाचे काम पूर्ण करून एमएमआरडीएने मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे.
सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने मोनोरेल दीड-दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, मोनोरेलची अद्यापही प्रतीक्षाच आहे. तेव्हा मोनोरेल केव्हा सेवेत दाखल होणार, याविषयी महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मोनोरेलच्या काही स्थानकांच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. ही कामे लवकरच पूर्ण होतील, असे सांगितले. तर मोनोरेलच्या उन्नत मार्गिकेत बरीच मोकळी जागा आहे व खालून मोठ्या संख्येने वाहने जातात, पादचारी जातात. अशावेळी मार्गिकेवरून, उंचावरून गाडीचा कोणताही भाग वा इतर काहीही कोसळले, तर मोठी दुर्घटना होऊ शकते. ही बाब लक्षात घेता आता या दृष्टीने मार्गिकेची पुन्हा नव्याने तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर मोकळी जागा बंद करून घेता येईल का वा इतर काही उपाययोजना करता येतील का, या दृष्टीने ही तपासणी होईल व त्यानंतर आवश्यक ते बदल करून मोनोरेल सेवेत दाखल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल होईल, अशी चर्चा असताना आता पुन्हा मोनोरेलची तपासणी व त्यानंतर आवश्यक ते बदल मार्गिकेत होणार असल्याने यात वेळ जाणार आहे. त्यामुळे मोनोरेल पुन्हा रूळांवर येण्यासाठी आता आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अपघात मालिका – २० किमीची चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल सुरुवातीपासून आर्थिक तोट्यात आहे. या मार्गिकेवर सातत्याने अपघात घडत आहेत. मोनोरेल सेवेत दाखल झाल्यापासून मोनोरेल गाड्यांमध्ये बिघाड, वीजपुरवठा खंडित होणे, गाड्यांचे भाग खराब होऊन तुटणे अशा घटना सातत्याने घडत आहेत.
- मोनोरेलच्या एका डब्याला २०१७ मध्ये आग लागली होती आणि त्यात डबा जळून खाक झाला होता. त्यानंतर मोनोरेल सेवा नऊ महिने बंद होती. आता पुन्हा सेवेत दाखल झालेल्या या मार्गिकेवर अपघातांची मालिका सुरूच होती. ऑगस्ट २०२५ मध्ये एकाच दिवशी दोन गाड्या अतिवजनामुळे बंद पडल्या.
- बंद पडलेल्या दोन गाड्यांपैकी एका गाडीतील ५८८ प्रवाशांना दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले होते. तर दुसऱ्या गाडीला ओढत नेऊन प्रवाशांची सुटका करावी लागली होती. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी मोनोरेल मार्गिकेवर अपघात घडला आणि त्यानंतर या प्रकल्पावर मोठी टीका झाली.
