मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका अनिश्चित काळासाठी बंद असून ही सेवा पुन्हा कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मोनोरेल मार्गिकेच्या सुरक्षा चाचण्यांसाठी निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवृत्त अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथक पुढील आठवड्यात सीएमआएस चाचण्यांना सुरूवात करणार आहे. ही चाचणी पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन मे अखेरपर्यंत मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

सप्टेंबर २०२५ पासून सेवा बंद

देशातील एकमेव चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका तोट्यात असून या मार्गिकेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. असे असले तरी काही प्रवाशांना मोनोरेल प्रवास फायद्याचा ठरतो. मोनोरेलची सेवा सप्टेंबर २०२५ पासून अनिश्चित काळासाठी बंद आहे. त्यामुळे मोनोरेलने नियमित प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होते. दरम्यान, तोट्यात असलेल्या मोनोरेल प्रकल्पात मागील वर्षी सातत्याने अपघात होत होते.

मोनोरेलमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये भीषण दुर्घटना घडली. दोन मोनोरेल गाड्या एकाच दिवशी कलंडल्या आणि प्रवासी बराच वेळ एका गाडीत अडकून पडले होते. या प्रवाशांना अक्षरश गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले. यानंतर एमएमआरडीएवर टीका झाली आणि मोनोरेलच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेनंतरही मोनोत पुन्हा अपघात झाला. अखेर महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आणि ही सेवा बंद झाली. संपूर्ण मार्गिकेचे अत्याधुनिकीकरण, नव्या मोनोरेल गाड्या सेवेत दाखल करून सुरक्षित असा मोनोरेलचा प्रवास करण्यासाठी काही कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एमएमआरडीए मोनोरेलची सेवा पूर्णपणे बंद केली.

आठ महिन्यानंतर मोनोरेल पुन्हा सेवेत होणार दाखल

सेवा बंद केल्यानंतर मार्गिकेच्या अत्याधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले. आता हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रोच्या धर्तीवर मोनोरेलच्याही सुरक्षा चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवृत्त सीएमआरएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथकाच्या माध्यमातून पुढील आठवड्यात मोनोरेलच्या चाचण्यांना सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. सीएमआरएस चाचण्यांना सुरूवात होणे म्हणजे मोनोरेल संचालनाची अंतिम प्रक्रिया. त्यामुळे आता मोनोरेलची प्रतीक्षा संपणार आहे. सुरक्षा चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेत मेअखेरीस मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

तब्बल आठ महिन्यांनंतर सेवेत दाखल होणाऱ्या मोनोरेलला मुंबईकरांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेल मार्गिकेवरील व्हिपीएन आणि आरसी मार्ग जंक्शन मोनोरेल स्थानक ‘मेट्रो २ ब’ (अंधेरी पश्चिम-मंडाले, मानखुर्द) मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाशी पादचारी पुलाने जोडण्यात येणार आहे. तर चेंबूर स्थानकही आता लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना पुढे मोनोरेलने चेंबूर – जेकब सर्कल असा प्रवास करता येणार आहे. याच अनुषंगाने मोनोरेलचीही प्रवासी संख्या वाढेल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात येत आहे.