मुंबई : मुंबईत आजवर मोसमी पावसाच्या हंगामात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरीही जुलैच्या तुलनेत ऑगस्ट कोरडाच असल्याचे पावसाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे मागील दशकभरातील ऑगस्टमधील पावसाच्या नोंदी पाहता यंदाचा ऑगस्ट हा तिसऱ्या क्रमांकाचा तूट असणारा महिना ठरला आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मुंबईत यंदा मोसमी पाऊस सरासरी वेळेहून १३ दिवस उशिराने दाखल झाला. त्यामुळे जूनमध्ये पावसाची मोठी तूट होती. मात्र, जुलैमध्ये संपूर्ण उत्तर कोकण प्रदेशात मुसळधार पावसाची नोंद झाली. यादरम्यान मुंबईतही सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली. जुलैच्या सुरुवातीच्या पाच दिवसांतच संपूर्ण महिन्याच्या सरासरीहून कुलाबा येथे १२ टक्के, तर सांताक्रूझ येथे ५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. ही आकडेवारी मागील दशकभरातील चौथ्या क्रमांकाची आकडेवारी ठरली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या सांताक्रुज विभागात ४४ टक्के, तर कुलाबा केंद्रात ६६ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. याआधी ऑगस्ट २०२३ मध्ये सांताक्रूझ येथे १७७.४ मिमी, कुलाबा येथे १११. ५ मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच ऑगस्ट २०१८ मध्ये सांताक्रूझ येथे २३५.२ मिमी आणि कुलाबा येथे १८८.७ मिमी पाऊस नोंदला गेला होता. ऑगस्ट महिन्यात सक्रिय हवामान प्रणालींचा अभाव असल्याने मुंबईत केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.

पावसाच्या प्रमाणात असमानता असून सप्टेंबर महिन्यातही देशात सरासरीहून कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या मोमसी पावसाच्या हंगामात (१ जून ते ३१ ऑगस्ट) हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात २ हजार २१६ मिमी अधिक, तर कुलाबा केंद्रात १ हजार ७६६ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीहून अधिक आहे. पुढील काही दिवसात बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणालींमुळे कोकणासह राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यातील पाऊस

विभाग  – अपेक्षित पाऊस – प्रत्यक्ष पाऊस – तूट

मुंबई उपनगर ( सांताक्रुज) – ५६६ मिमी – ३१५ मिमी – ४४ टक्के

मुंबई शहर (कुलाबा) – ४८२ मिमी – १६४ मिमी – ६६ टक्के

धरणांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील जलसाठा मंगळवारी ९५.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी म्हणजेच २०२५ मध्ये याच दिवशी धरणांमध्ये एकूण ९६.२३ टक्के, तर २०२४ मध्ये ९६.८४ टक्के पाणी होते.