मुंबई : यावर्षी पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही असा दावा आम्ही करत नाही. पण पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठीच्या उपाययोजना शंभर टक्के कार्यरत आहेत की नाही याची पाहणी आम्ही करत आहोत. मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळे सखल भागात पाणी साचणारच, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे आमदार अमित साटम यांनी यांनी पावसाळ्याच्या तोंडावर केलेल्या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी जो सर्वंकष विचार व्हायला हवा होता तो गेल्या पंचवीस वर्षात झालेला नाही, असे म्हणत साटम यांनी शिवसेनेवर (ठाकरे) त्याचे खापर फोडले.

पावसाळापूर्व तयारीचा एक भाग म्हणून अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेतील भाजप व शिवसेनेच्या (शिंदे) लोकप्रतिनिधींनी मंगळवारी दक्षिण मुंबईतील ब्रिटानिया, क्लीव्हलँड आणि लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनची संयुक्त पाहणी केली. यावेळी साटम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि परिणामकारक निचरा व्हावा, यासाठी महानगरपालिकेने सर्वंकष कृती आराखडा तयार केला आहे.

हा आराखडा केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे, अशी माहिती साटम यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. मुंबईत पाणी साचू नये म्हणून एक सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याची गरज होती. मात्र गेल्या पंचवीस वर्षात त्यादृष्टीने प्रयत्न झाले नाहीत अशा शब्दात साटम यांनी नाव न घेता शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सत्ताकाळावर टीका केली.

१५ मेपासून यंत्रणा कार्यरत

पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेची ६ मोठी व १० लहान पंपिंग स्टेशन आहेत. गेल्या वर्षी २६ मे रोजी पहिला पाऊस पडला होता. त्यामुळे यावेळी ही सर्व यंत्रणा १५ मेपासूनच कार्यरत करण्यात आली असून, शहरभरात ५५० हून अधिक पंप तैनात करण्यात आले आहेत. तसेच आगाऊ हवामान इशाऱ्यांसाठी आयआयटी मुंबईची ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ही कार्यान्वित करण्यात आली आहे.

महापालिकेने आयआयटी मुंबईसोबत भागीदारी करून ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. यामुळे पूर्वी केवळ तीन ते चार तास आधी मिळणारे अतिवृष्टीचे इशारे आता तब्बल ४८ तास आधी मिळू शकतील, असे साटम यांनी सांगितले.