मुंबई : येत्या पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास पाणी उपण्यासाठी तब्बल ५४७ पंप बसवण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणी उपसा पंपांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र हे पंप मध्येच बंद पडले तर त्याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला मिळावी याकरीता या पंपांवंर आधुनिक ‘आयओटी आधारित देखरेख प्रणाली’ विकसित करण्यात आली असून प्रत्येक उदंचन पंपावर ‘आयओटी’ उपकरण बसविण्यात आले आहे. ‘आयओटी’ तंत्रज्ञानामुळे उदंचन पंपांवर प्रभावी नियंत्रण शक्य होणार आहे.
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे दरवर्षी सखल भागात पावसाचे पाणी साचते व त्याचा निचरा होत नाही. मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईत पावसाचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका मुंबईला असतो. मात्र पाणी साचण्याची ठिकाणे कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. तसेच सूक्ष्म नियोजनांतर्गत दरवर्षी विविध ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचेही काम केले जात आहे. तरीही मुंबईतील पाणी साचण्याची ठिकाणे कमी झालेली नाहीत. यंदा तर पावसाचे पाणी उपसण्यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल ५४७ पंपांची व्यवस्था केली आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस पाऊस पडू लागला होता. त्यामुळे यंदा सावधगिरीचा उपाय म्हणून १५ मेपासूनच पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.
मुसळधार पाऊस कोसळताच सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत अहोरात्र (३ सत्र) मनुष्यबळासह ५४७ उदंचन संच कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात शहर विभागातील १४६, पूर्व उपनगरे विभागातील १७८ आणि पश्चिम उपनगरातील २२३ उदंचन संचांचा समावेश आहे. उदंचन संचांच्या कार्यावर सतत देखरेख ठेवण्यासाठी यावेळी आयओटी प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे उदंचन पंपाची कार्यस्थिती, स्थान, सुरू – बंद होण्याची वेळ, कार्यरत कालावधी आणि तांत्रिक माहितीची स्वयंचलित नोंद ठेवली जाणार आहे. ही माहिती केंद्रीकृत डॅशबोर्डवर प्रत्यक्ष वेळेत उपलब्ध होणार आहे. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी शुक्रवारी आपत्कालीन व्यवस्थापनात या डॅशबोर्डची पाहणी केली.
कार्यान्वित, बंद पंपांची माहिती मिळणार
या डॅशबोर्डमुळे वरिष्ठ अधिकारी, नियंत्रण कक्ष, तसेच संबंधित विभागांना परिस्थितीचा आढावा घेणे अधिक सुलभ होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि परिणामकारक बनली आहे. तसेच, पंपांच्या कार्यक्षमतेवर सतत देखरेख ठेवून आवश्यक दुरुस्ती, देखभाल आणि मनुष्यबळ नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. परिणामी, पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
या प्रणालीमुळे उदंचन पंप सुरू आहे किंवा बंद आहे, अतिवृष्टीच्या काळात किती पंप सुरू आहेत, किती वेळ बंद आहेत या बाबी प्रत्यक्ष वेळेत कळणार आहे. सध्या याबाबतचा डिस्प्ले महानगरपालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात देण्यात आला. हा डिस्प्ले प्रशासकीय विभागनिहाय उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून, पंपांची स्थिती दर्शविणारा डॅशबोर्ड प्रशासकीय विभागांच्या नियंत्रण कक्षात दिसेल. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या संबंधित अभियंत्यांचे संपर्क क्रमांक देखील उपलब्ध करावेत, असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले.
मानवी हस्तक्षेप कमी होणार, पालिका आयुक्तांचा विश्वास
आयओटी लॉगिंग प्रणालीमुळे उदंचन संचांच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता निर्माण झाली आहे. उदंचन पंप प्रत्यक्षात किती वेळ कार्यरत होता, त्याद्वारे किती कालावधीसाठी पाण्याचा उपसा करण्यात आला, तसेच संबंधित यंत्रणेचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे का, याची नोंद डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहत असल्याने कामाचे अचूक परीक्षण करता येते. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास आश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.
