मुंबई :मुंबई आणि उपनगरांसह घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. घाट भागात भूस्खलन, रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने, रेल्वे मार्गावर झाड पडल्याने अनेक लोकल, रेल्वेगाड्या रद्द, इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या. लोकल उशिरा धावत होत्या. रुळांखालची खडी वाहून गेल्याने कर्जत – खोपोली लोकल सेवा सोमवारी सकाळी बंद करण्यात आली होती. तब्बल साडे नऊ तासांनी खोपोली मार्गावरील लोकल सेवा सुरू झाली.
मध्य रेल्वेच्या कर्जत–लोणावळा दक्षिण-पूर्व घाट विभागात ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. तसेच खंडाळा–मंकी हिलदरम्यान मध्य मार्गावरही दरड कोसळल्याने तिन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे अनेक मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेगाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या. काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून काहींच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला. याचदरम्यान, मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कर्जत ते खोपोली मार्गावर रेल्वे रुळांखालची खडी (बॅलेस्ट) वाहून गेल्याने या मार्गावरील लोकल सेवा बंद करण्यात आली. कर्तव्यावरील दक्ष कर्मचाऱ्यांनी वेळेत ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला. रेल्वे अभियंते आणि देखभाल पथके घटनास्थळी पोहोचून मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले. परंतु, पावसाचा जोर कायम राहिल्याने, अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर रेल्वे मार्ग दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पळसधरी-खोपोली एकेरी मार्ग सुरक्षित असल्याची घोषणा सायंकाळी ६.३४ वाजता मध्य रेल्वेद्वारे करण्यात आली. ताशी १० किमीच्या मर्यादित वेगाने पहिली लोकल स्थानकातून रवाना झाली. त्यानंतर ताशी ३० किमीच्या वेगाने लोकल सेवा सुरू केली.
