मुंबई : पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना अद्याप पुरेशी गती मिळालेली नसताना या कामांच्या पाहणीच्या दौऱ्यांना मात्र गती आली आहे. महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. तर गुरुवारी उपमहापौर संजय घाडी हे नालेसफाईच्या कामांची पाहणी करणार आहेत. महापौर आणि उपमहापौर यांनी दोन स्वतंत्र दौरे आयोजित केल्यामुळे महायुतीत समन्वय नसल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर या स्वतंत्र दौऱ्यांमुळे पालिकेचे अधिकारीही काम करण्याऐवजी दौरे आयोजित करण्यातच व्यस्त झाले आहेत.
पावसाळा सुरू होण्यास अगदी काही दिवस उरले असून नालेसफाईच्या कामांना वेग देण्यासाठी आता पालिका प्रशासन आणि सत्ताधारी दोघेही कामाला लागले आहेत. मंगळवारी महापौर रितू तावडे यांनी पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. सोमवारीही त्यांनी नालेसफाईची पाहणी केली व शुक्रवारीही पाहणीचा एक कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.
तर अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. मुंबई महापालिकेत प्रथमच सत्तेवर आलेल्या भाजपची येत्या पावसाळ्यात कसोटी असून त्या पार्श्वभूमीवर यंदा नालेसफाईसाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. मंगळवारी नालेसफाईचे हे दोन दौरे झाल्यानंतर गुरुवारी आता उपमहापौर संजय घाडी यांनी नालेसफाईचा दौरा आयोजित केला आहे. घाडी हे कुर्ला येथील सफेद पूल नाला, मिठी नदी येथील नालेसफाईच्या कामांच्या पाहणी करणार आहेत.
दौरेच दौरे
मंगळवारी महापौरांनी भांडुप (पूर्व) येथील उषा नगर नाला, मुलुंड (पूर्व) येथील गव्हाणपाडा अग्निशमन केंद्राजवळील बाऊंड्री नाला, घाटकोपर येथील गारोडिया नगर मेट्रो स्थानकाखालील सोमय्या नाला, कुर्ला (पश्चिम) येथील साकीनाका मेट्रो स्थानकाखालील नाला क्रमांक १० ची पाहणी केली. तर पश्चिम उपनगरांतील कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांची तसेच जयवंत साळवी मार्गावरील मलजल प्रक्रिया केंद्राची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर उपस्थित होते. तर गुरुवारी उपमहापौरांचा दौरा होणार आहे. आधीच यावेळी नालेसफाईची कामे उशीरा सुरू झाल्यामुळे पावसाळ्याच्या आधी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचा ताण प्रशासनावर असताना त्यात या दौऱ्यांमुळे काम करायचे की दौरे करायचे असा प्रश्न अधिकारी विचारू लागले आहेत.
समन्वय नाही
महापौर आणि उपमहापौर यांचे दोन स्वतंत्र दौरे आयोजित करण्यात आल्यामुळे महायुतीच्या दोन घटक पक्षांमध्ये समन्वय नसल्याची चर्चा आहे. महापौरांच्या दौऱ्याला उपमहापौरांना आमंत्रित न केल्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शुक्रवारी महापौर पश्चिम उपनगरातील नालेसफाईचा दौरा करणार असून उपमहापौर हे दहिसर येथील नगरसेवक आहेत. मात्र त्यांना याबाबत कोणतीही कल्पना दिलेली नसल्याचे समजते. त्यामुळेही ही नाराजी वाढली आहे.
