मुंबई : जूनच्या तुलनेत जुलैमध्ये हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो, करोना आणि एच १ एन १ च्या रुग्णांमध्ये वाढ झाली. ही वाढ ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांतही कायम राहिली आहे. ऑगस्टमध्ये हिवतापाचे सर्वाधिक १ हजार १४२ रुग्ण आढळले आहेत.
जूनमध्ये हिवतापाचे ६५५ रुग्ण होते. जुलैमध्ये त्यांची संख्या १ हजार ३८० वर पोहोचली. ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत १ हजार १४२ रुग्णांची नोंद झाली. डेंग्यूचे रुग्ण जूनमध्ये २६६, जुलैमध्ये ४६६, तर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ३४७ होते. लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ दिसून आली. जूनमध्ये ३३, जुलैमध्ये ७८ आणि ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत ७८ रुग्ण आढळले जूनमध्ये. गॅस्ट्रोचे ६०३ रुग्ण आढळले होते, जुलैमध्ये या रुग्णांची संख्या ८५१ वर पोहोचली. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात २९८ रुग्णांची नोंद झाली.
एच १ एन १ च्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून, जूनमध्ये ५८, जुलैमध्ये १०५ आणि ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत १४६ रुग्ण आढळले. करोनाचे जूनमध्ये २७, जुलैमध्ये ५८ आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ३९ रुग्ण आढळले. चिकुनगुनियाचे जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी सात, तर ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत १९ रुग्ण आढळले.
डासांच्या उत्पत्तीस्थळांवर कारवाई
मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर घराघरांत सर्वेक्षण आणि डासांच्या उत्पत्तीस्थळांवर कारवाई सुरू केली आहे. १ ते १५ ऑगस्टदरम्यान ५ लाख ६३ हजार ३८२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३२ हजार १५८ रक्तनमुने घेण्यात आले. हिवताप नियंत्रणासाठी १७ हजार ७९३ उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. डेंग्यू नियंत्रणासाठी ४ लाख ७४ हजार ३४१ ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून, ११ हजार २२७ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळली.
