मुंबई : हिवताप, डेंग्यू व लेप्टोच्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील तीन वर्षांमध्ये हिवताप, आणि लेप्टोस्पायरोसिसमुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र त्याचवेळी डेंग्यूने होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत काहीशी घट झाली आहे.
हिवताप व लेप्टोच्या मृत्यूच्या प्रकरणांबरोबरच संशयित मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील तीन वर्षांत हिवताप आणि लेप्टोस्पायरोसिसच्या आजारांमुळे संशयित मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याचे निष्पन्न झाले. या मृत्यूंची पुनरावलोकन समितीद्वारे तपासणी केल्यानंतर मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
मुंबईमध्ये २०२३ मध्ये हिवतापाचे ११ संशयित मृत्यू आढळून आले. २०२४ आणि २०२५ मध्ये ही संख्या प्रत्येकी १८ इतकी होती. या मृत्यूंची पुनरावलोकन समितीने तपासणी केल्यानंतर २०२३ मध्ये दोन, तर २०२४ आणि २०२५ मध्ये प्रत्येकी ७ जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. लेप्टोस्पायरोसिसमध्ये गंभीर चित्र दिसून आले. २०२३ मध्ये ३२ संशयित मृत्यूंपैकी १५ मृत्यू लेप्टोस्पायरोसिसमुळे
झाले आहेत. २०२४ मध्ये संशयित मृत्यूंची संख्या ४६ वर गेली आणि त्यापैकी २२ मृत्यू निश्चित झाले. २०२५ मध्ये ३२ संशयित मृत्यूंपैकी १९ मृत्यू लेप्टोस्पायरोसिसमुळे झाल्याचे मृत्यू पुनरावलोकन समितीने निश्चित केले. हिवताप व लेप्टोस्पायरोसिसच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असताना डेंग्यूच्या मृत्यूंच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. २०२३ मध्ये डेंग्यूच्या ४३ संशयित मृत्यूंची नोंद झाली होती. त्यापैकी १४ मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचे निश्चित झाले. २०२४ मध्ये संशयित मृत्यूंची संख्या २० इतकी कमी झाली होती, यातील पाच मृत्यू पुनरावलोकन समितीकडून निश्चित करण्यात आले. २०२५ मध्ये १६ संशयित मृत्यूंपैकी आठ मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
