लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पावसाळाजन्य आजारांची मासिक तुलनात्मक आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मुंबईत हिवताप आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मात्र डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गतवर्षातील याच चार महिन्यांच्या काळातील पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांत हिवतापाचे ७,४२२ रुग्ण आढळले, गेल्या वर्षी या कालावधीत त्यांची संख्या ५,१४४ इतकी होती. तर स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून या रुग्णांची संख्या ७१ वरून थेट ५०४ वर पोहोचली आहे. दुसरीकडे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३,३५६ वरून २,९४१ वर, गॅस्ट्रोची रुग्णसंख्या २,६३९ वरून २,१९४ वर, लेप्टोस्पायरोसिसची रुग्णसंख्या ५४९ वरून २८६ वर, चिकुनगुनियाची रुग्णसंख्या ५०९ वरून ६६ वर आणि कोविड-१९ ची रुग्णसंख्या ६७८ वरून १६५ वर आली आहे.
विविध उपक्रमांतून जनजागृती
– गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांतील वैद्यकीय शिबिरांत एकूण ८४,२०८ नागरिकांची नोंद झाली. तसेच हिवताप तपासणीसाठी ५,१३० रक्ताचे नमुने घेऊन रुग्णांना तातडीने आवश्यक ते उपचार देण्यात आले. – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभागातर्फे सर्व प्रभागांमध्ये विविध सार्वजनिक आरोग्य जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आले. जनमानसात जनजागृती करण्यासाठी गणेश मंडळांना ”आयईसी” भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात आले.
– मोठ्या जनसमुदायापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी हिवताप आणि डेंग्यू जनजागृतीपर जिंगल्स (गाणी) वाजवण्यात आल्या. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी व ती नष्ट करण्यासाठी सर्व महापालिका रुग्णालये आणि प्रसूतीगृहांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
