मुंबई : मुंबईतील नालेसफाईची सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी वारंवार यंत्रणांना सूचना दिल्या होत्या. मात्र मुदत संपल्यानंतरही मुंबईतील अनेक भागांमध्ये नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. उपनगरातील काही नाल्यांमध्ये अद्यापही कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे निदर्शनास येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहेत. तसेच, विरोधकांनीही नालेसफाईच्या कामावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेतर्फे नालेसफाईची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान काढला जातो. उर्वरित १० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जातो. पावसाळयात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. सत्ताधाऱ्यांनीही नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यांवर भर दिला आहे. मात्र, विरोधकांकडून नालेसफाईच्या कामांवर सातत्याने टीका केली जात आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वेळोवेळी नालेसफाईच्या कामांचा आढावा घेऊन ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नुकतीच आयुक्तांनी दिलेली मुदत संपुष्टात आली. मात्र, अद्यापही कुर्ला, जीटीबी नगर, अंधेरी, मानखुर्द – गोवंडी आदी भागांमध्ये नालेसफाई पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी नाल्यांमधून काढलेला गाळ वेळेवर उचलला जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
मरोळ नाला, श्रीकृष्ण नाला, भारती नगर नाला, देवनार नाला, लाल्लुभाई नाला, पी अँड टी नाला, दुर्गा नगर नाला आदींची अद्यापही पूर्णपणे स्वच्छता झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. ३१ मेची मुदत उलटून गेल्यानंतरही कामे पूर्ण का झाली नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पावसाळा तोंडावर असताना उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आव्हान आता महापालिका प्रशासनासमोर आहे.
नालेसफाईच्या कामांबाबत महापालिका अधिकारी, कंत्राटदार यांच्याकडून अपेक्षित माहिती दिली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) प्रभाग क्र. १८१ मधील नगरसेवक अनिल कदम यांनी केला. नागरिकांकडून दररोज कार्यालयात केवळ नालेसफाईच्या कामांबाबत विचारणा केली जाते. विभागातील खरोक्रिक नाला, शांतीनगर नाला, आझाद मोहल्ला, मटणवाला नाला, वाय जंक्शन नाला आदींची अद्यापही स्वच्छता झालेली नाही. महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे असून त्यांच्याकडून केवळ तोंडदेखली कार्यवाही केली जात असल्याची टीका कदम यांनी केली.
नालेसफाईची कामे समाधानकारक नाहीत. यंदाही नागरिकांना पावसाळ्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे दावे पाण्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. पालिकेचे नियोजन प्रभावी नसून अनेक भागांत नालेसफाई झालेली नाही, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केला.
दरम्यान, अनेक विभागांतील नालेसफाई पूर्ण झाली आहे. काही विभागांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे नालेसफाई पूर्ण झालेली नाही. त्यासाठी प्रशासनाकडून १५ जूनपर्यंत मुदत वाढवून घेण्यात आली आहे. असे असले तरीही १० जूनपर्यंतच मुंबईतील नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
