मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही याचा पुनरुच्चार बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी पुन्हा एकदा केला. कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी याचा समावेश असलेल्या परिमंडळ पाचमध्ये नालेसफाई झालेलीच नसल्याचे सांगताना नालेसफाई होऊ न देणारी अदृश्य शक्ती कोणती? असा सूचक सवाल सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. यंदा नालेसफाई योग्य झालेली नसल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी मान्य केले असून यावेळी लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचीही कबुली त्यांनी दिली.

स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत नालेसफाईवरून पुन्हा एकदा वादळी चर्चा झाली. सलग दोन आठवडे नालेसफाईवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर या आठवड्यातही नालेसफाईच्या कामांवरून सदस्यांनी चिंता व्यक्त केली. कुर्ला ते देवनार, गोवंडीचा भाग असलेल्या परिमंडळ पाचमध्ये नालेसफाईसाठी नेमलेल्या कंत्राटदारांनी कामच न केल्यामुळे बाजूच्या परिमंडळातील कंत्राटदाराला हे काम दिले जाणार आहे. याबातचा प्रस्ताव पटलावर चर्चेसाठी आला असता सदस्यांनी नालेसफाईच्या कामांवरून प्रशासनाला जाब विचारला.

यंदा पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना आधीच उशीर झाला असून पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण झाली नाही तर मुंबईत पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे, याचा पुनरुच्चार सदस्यांनी विशेषतः सत्ताधाऱ्यांनी केला. तर यंदा लोकांच्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरे जावे लागेल, असा मुद्दा काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी उपस्थित केला. तर भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी या सगळ्याचे खापर गेल्या पंचवीस वर्षातील कारभारावर फोडले. २५ वर्षातील गाळ तीन महिन्यात कसा काढणार असा सवाल त्यांनी केला.

आरोग्य समिती अध्यक्षांच्या प्रभागातच नाले तुंबलेलेआरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांचा प्रभाग असलेल्या चांदिवली परिसरातील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाला यावेळी सुरुवातच झालेली नाही. भांदिर्गे यांनी याबाबत तुंबलेल्या नाल्याची छायाचित्रे स्थायी समितीमध्ये सादर केली. यावेळी पाऊस जास्त पडला तर नाले तुंबतील व कुर्ला आणि आजूबाजूचा परिसर बुडणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. कुर्ला आणि आसपासच्या परिसरातील नालेसफाई होऊ न देण्यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर मुंबईत आता नालेसफाई माफिया कार्यरत असल्याचा आरोप एमआयएमचे गटनेते जमीर कुरेशी यांनी केला.

नालेसफाई यंदा झालेली नाही तसेच, नाल्यांवर अतिक्रमण झालेले असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होणार नाही, असा मुद्दा सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडला. यापूर्वीचे कंत्राटदारच नवीन कंत्राटदारांना काम करू देत नाहीत, त्यांना क्षेपणभूमी मिळू नये, यंत्रसामुग्री मिळू नये, अशी व्यवस्था करीत असल्याचा आरोपही खणकर यांनी केला. यावेळी नालेसफाई झालेली नसल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले.कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई करणार परिमंडळ पाचमधील नालेसफाईची परिस्थिती गंभीर असून नालेसफाईच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.