मुंबई: पालिकेतील सत्ताधारी पक्ष सांगतो की त्यांनी मुंबईतील गटारांची १३० टक्के साफसफाई केली आहे. गटारांची पावसाळ्यापर्यंत ८० टक्के साफसफाई होणे अपेक्षित आहे. १३० टक्के साफसफाई करण्यात आली म्हणजे मुंबईतील गटारे उलट करुन घासली का? असा खोचक सवाल शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

मुंबईची पहिल्याच पावसात तुंबई कशी झाली. मुंबई ही देशाची राजधानी आहे. ती अशा प्रकारे तुंबणे योग्य नाही. मुंबईतील नालेसफाई हा विषय महत्त्वाचा असताना सभागृहात एकही मंत्री, राज्यमंत्री उपस्थित नाही. आमचे बोलणे कोणी ऐकायचे, रिकाम्या बाकांनी का? असा सवाल परब यांनी विचारला. मंत्री नाहीत तर चर्चा नाही अशी भूमिका विरोधी पक्षातील आमदारांनी घेतली. आम्हाला गृहीत धरता का? मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्द पाळला जात नाही अशी टीका परब यांनी केली. काँग्रेसचे सतेज पाटील, ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, सचिन आहिर यांनी परब यांना साथ दिली. मंत्री नाही तर चर्चा नाही. अशी ठाम भूमिका घेतल्याने सभापती संजय घोडके यांनी मंत्र्यांना बोलविले. त्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत सभागृहात आल्यानंतर चर्चा पुन्हा सुरू झाली.

मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प हा ८१ हजार कोटीचा आहे. त्यात केवळ २०९ कोटीचे काम हे मान्सूनपूर्व नालेसफाईचे आहे. ही नालेसफाई पहिल्याच पावसात फोल ठरली. पहिल्याच पावसात तुंबलेल्या पाण्यामुळे महापौर पडता पडता वाचल्या. पालिकेचा कर्मचारी नाल्यात पडला. ही नालेसफाई अद्याप झालेली नाही. गटारात झाडाच्या फांद्या अडकलेल्या आहेत. ही गटारे साफ करण्यासाठी आता तामिळनाडू, ओदिसा, बंगाल इथून बालमजूर आणले गेले आहेत. साफसफाईची काही कामे यांत्रिक पद्धतीने तर काही मानवी पद्धतीने करावी लागतात. त्यासाठी बालमजुरांना नाल्यात उतरविले जात आहे. पालिकेतील सत्ताधारी म्हणतात की नालेसफाई ही १३० टक्के झालेली आहे. १३० टक्के नालेसफाई झाली असेल तर गटारे काही उलट करून घासली गेली आहेत का? असा खोचक प्रश्न परब यांनी उपस्थित केला. १३० टक्के नालेसफाई करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या जागतिक स्तरावर सत्कार करावा लागेल.असा टोला परब यांनी मारला.