मुंबई : पावसाळा सुरू झाला की त्यापाठोपाठ साथीच्या आजारांचा प्रादुर्भावही वाढण्यास सुरूवात होते. मागील आठवड्याभरापासून मुंबईत सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस पडत असल्याने तूर्तास फारसे रुग्ण आढळत नसले तरी पुढील आठवड्याभरात साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर हिवताप, डेंग्यू, लेप्टो, अतिसार यांसारख्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात होते. सध्या पाऊस सुरू असल्याने अतिसार व डेंग्यूचे काही रुग्ण आढळून आले आहेत. मात्र पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्यात हिवताप, डेंग्यूच्या अळ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. परिणामी, डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पुढील १० ते १५ दिवसांत या आजारांचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. पाऊस सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा हाेऊ लागला आहे. त्यामुळे अतिसाराचे रुग्ण काही प्रमााणात दिसू लागले आहेत. पुढील काही दिवसांत अतिसाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे. त्यानंतर जुलै अखेरपर्यंत हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

हिवताप व डेंग्यूच्या अळ्यांची पैदास साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. मुसळधार पावसामध्ये हिवताप व डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नष्ट होत असतात. सध्या जोरदार पाऊस होत असल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे हिवताप व डेंग्यूच्या आजारांचा फारसा धोका नाही. मात्र उंदीर किंवा अन्य प्राण्यांच्या मलमूत्राचा संबंध आलेल्या पाण्याचा नागरिकांच्या जखमेशी संपर्क आल्यास लेप्टोचा आजार पसरण्याचा धोका अधिक आहे. बाधित पाण्याशी संपर्क आल्यानंतरही संबंधित व्यक्तीला १५ दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून जाताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने अतिसाराचा धोका अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून पिणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यावरील उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळावे, आवश्यकता पडल्यास ताजे शिजवलेले पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावे. कोणत्याही प्रकारची ओली चटणी आदी पूर्णपणे टाळावे, असा सल्ला नायर रुग्णालयाच्या जनऔषध विभागाच्या प्रमुख डॉ. ऋजुता हाडये यांनी दिला.

पाऊस थांबला की अधिक रुग्ण

पाऊस सुरू झाल्यानंतर तात्काळ साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत नाही. पाऊस थांबल्यानंतर आठ ते १० दिवसांनंतर आजारांची लक्षणे दिसू लागतात. पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या स्वच्छ पाण्यात हिवताप व डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. डासांची पैदास रोखण्यासाठी पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी साचणाऱ्या वस्तूंची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. लेप्टोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खराब पाण्यातून चालणे टाळावे. या सर्व आजारांचे रुग्ण येत्या आठवड्याभरात वाढण्याची शक्यता असल्याची माहिती डॉ. रीना बिबाल्स यांनी दिली.