मुंबई: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी रेल्वे, मुंबई महापालिका, बेस्ट, मेट्रो, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्य संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे ‘इंटिग्रेटेड प्लॅन’ तयार करून समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या.

पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत रेल्वे हद्दीतील नालेसफाई, मान्सूनपूर्व तयारी आणि पूरनियोजनाचा आढावा घेताना पालकमंत्री शेलार बोलत होते. बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मिणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग, मुंबई शहर व उपनगरचे जिल्हाधिकारी तसेच महापालिका, रेल्वे आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी १५ मायक्रो टनेल उभारण्यात आल्याची माहिती दिली. त्यापैकी चार टनेल यावर्षी पूर्ण करण्यात आले आहेत.

तसेच जलनिस्सारणासाठी १२६ पंप कार्यान्वित करण्यात आले असून सुमारे २,४०० वॅगन इतका गाळ काढण्यात आला आहे. मध्य रेल्वेनेही २२० पंपांची व्यवस्था केली असून ३५० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील १६० नाले आणि गटारांची साफसफाई पूर्ण केल्याचे सांगितले. दोन्ही रेल्वे मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

पादचारी पूल, होर्डिग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट

पालकमंत्री शेलार यांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन, स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी नियंत्रण, अडकलेल्या प्रवाशांना अन्न व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यासाठी स्वतंत्र आणि एकात्मिक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच रेल्वे स्थानकांतील व बाहेरील पादचारी पूल, वाहतूक पूल, स्थानक परिसरातील जाहिरात फलक आणि अन्य संरचनांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय रेल्वे आणि महापालिकेकडील पंप यंत्रणांचा संयुक्त वापर सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र समन्वय आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली.