मुंबई : सत्ताधारी आणि प्रशासनाकडून नालेसफाईबाबत करण्यात आलेले दावे दिशाभूल करणारे असून उपनगरांतील बहुतांश नाल्यातील गाळ अद्यापही काढण्यात आलेला नाही, असा आरोप मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते व नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी शनिवारी केला. तसेच, गाळ उपसा न झालेल्या आणि कचऱ्याने भरलेल्या विविध नाल्यांची छायाचित्रे दाखवून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका केली.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेने नालेसफाईची कामे हाती घेतली असून पावसाळा तोंडावर आला तरीही नाल्यांची स्वच्छता झालेली नाही. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यापूर्वी प्रशासनाला वारंवार ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूण करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, दिलेली मुदत उलटल्यानंतरही नालेसफाई पूर्ण झालेली नाही.
त्यांनतर नालेसफाईसाठी अधिकाऱ्यांनी १५ जूनपर्यंत मुदतवाढ मागून घेतली. ही मुदत संपायला आली तरीही अनेक नाल्यांची स्वच्छता झालेली नाही, असा आरोप मनसेकडून करण्यात आला. मुंबई उपनगरातील वडाळा, धारावी, भारत नगर, नाहूर गोवंडी, कुर्ला, पंचशील नगर अशोक नगर, क्रांती नगर – कुर्ला वाकोला, मानखुर्द, चेंबूर, केशव पाडा नाला आदींचे छायाचित्रे दाखवून किल्लेदार यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाचे दावे खोडून टाकले.
मुंबई जलमय होऊ द्यायची नसेल, तर प्रभावी नालेसफाई गरजेची असल्याचे मत किल्लेदार यांनी व्यक्त केले. सत्ताधारी ज्या दिवशी नालेसफाई पाहणीसाठी जातात, त्यापूर्वी पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना सूचित करतात. त्यानंतर नाल्यातील गाळ संयंत्रांनी काढण्यात येत असल्याचे चित्र निर्माण करतात, असा गंभीर आरोप किल्लेदार यांनी केला. पावसाला विलंब झाल्याच्या संधीचा फायदा घेऊन प्रशासनाने नालेसफाई पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासोबतच किल्लेदार यांनी रस्ते काँक्रिटीकरण, खड्डे बुजविण्याचे प्रस्ताव, पाणीटंचाई या मुद्द्यावरूनही प्रशासनावर टीका केली.
