मुंबई : पावसाळा तोंडावर आल्याने मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याने वृक्षछाटणीला वेग दिला असून आतापर्यंत सुमारे ४६ हजार ३३६ झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे १२ हजार ५६१ झाडांची छाटणी पूर्ण करण्यात उद्यान खात्याला यश आले असले तरीही अनेक ठिकाणी वृक्षछाटणीच्या पद्धतीवर पर्यावरणप्रेमी आक्षेप घेऊ लागले आहेत. वृक्ष छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरू असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. मात्र, महापालिकेने या आरोपांचे खंडन केले असून झाडांच्या आवश्यकतेनुसार वृक्षछाटणी केली जात असल्याचा दावा केला आहे. तसेच, शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षछाटणी कशी करावी, याचे धडे देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाची पहिली कार्यशाळा आज (बुधवारी) आयोजित करण्यात आली आहे.

मान्सूनपूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या उद्यान खात्याने मुंबईतील धोकादायक झाडांच्या छाटणीला सुरुवात केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडणे, फांद्या तुटणे आदी घटना घडतात. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले असून जखमींचीही संख्या मोठी आहे. तसेच, अनेकदा मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील होते. झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी केल्यास या घटनांना आळा बसू शकतो. त्यामुळे महापालिकेकडून शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षछाटणी करण्यावर भर देण्यात येत आहे. वृक्षछाटणीच्या अनुषंगाने मुंबईत आतापर्यंत ४६ हजार ३३६ झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अद्यापही ती प्रकिया सुरूच आहे. त्यापैकी १२ हजार ५६१ झाडांची छाटणी पूर्ण झाली असून मे अखेरपर्यंत उर्वरित म्हणजेच ३३ हजार ७७५ झाडांची छाटणी करण्याचा संकल्प उद्यान खात्याने सोडला आहे. याच सर्वेक्षणात ३३५ झाडे धोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. भविष्यातील धोका टाळण्यासाठी आतापर्यंत २७९ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. सुमारे १.५ लाख झाडांचे सर्वेक्षण करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. तसेच, खासगी आस्थापना व सोसायट्यांच्या हद्दीतील झाडांच्या छाटणीसाठी उद्यान खात्याने १ हजार नोटीस बजवाल्या आहेत.

निष्काळजीपणे वृक्षछाटणी

दरम्यान, महापालिकेतर्फे सुरू असलेल्या वृक्षछाटणीबाबत पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी वडाळा, माटुंगा परिसरातील नागरिकांकडूनही तक्रारी करण्यात आल्या होत्या. निष्काळजीपणे झाडे तोडण्यात येत असून त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. जेव्हीपीडी मार्गावर केवळ झाडाच्या खालच्या भागाची छाटणी केली जात आहे. वरील भागाकडे सुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप पर्यावरण कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी केला आहे. या पद्धतीमुळे झाड अधिकाधिक उंच वाढून भविष्यात ते पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने झाडांची वरून खालपर्यंत छाटणी करावी. तसेच, चुकीच्या पद्धतीने छाटणी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याविरोधात आवाज उठवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

…तर कंत्राटदारावर दंडात्कम कारवाई

झाडाची छाटणी करणाऱ्या कामगारांना कित्येक वर्षांचा अनुभव असतो. तसेच, प्रत्येक झाडाची रचना, गरज वेगळी असते. त्यानुसारच वृक्षछाटणी केली जाते. तसेच, चुकीच्या पद्धीताईने वृक्षछाटणी केल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाते, असे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शास्त्रोक्त वृक्षछाटणीसाठी कार्यशाळा

महापालिकेच्या उद्यान खात्यात काम करणाऱ्या कामगार – कर्मचाऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षछाटणी कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यासाठी बुधवारी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत महापालिकेचे अधिकरी – कर्मचारी तसेच प्रत्यक्ष छाटणी करणारे कामगार उपस्थित राहणार आहेत. तसेच, कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही शास्त्रोक्त पद्धतीच्या वृक्षछाटणीबाबत मार्गदर्शन केले जाईल. यंदाची ही पहिली कार्यशाळा असून आवश्यकतेनुसार आणखी कार्यशाळा आयोजित करण्याचा पालिकेचा मानस आहे.