मुंबई :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारी नदी-नाल्यांच्या सफाईचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करावे. ही कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे व्हावी यासाठी दुय्यक अभियंते, सहाय्यक अभियंत्यांनी पूर्ण वेळ प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहावे, अशी सक्त ताकीद अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. त्याचबरोबर गाळ काढण्याच्या कामाचे नालेनिहाय आणि दिवस निहाय नियोजन करावे, संगणकीय प्रणालीमध्ये दररोज अद्ययावत माहिती भरावी, नाल्यांमधील सांडपाण्याच्या पृष्ठभागावर वाहणारा आणि तरंगणारा घनकचरा विशेषत: प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी जाळ्या बसवाव्यात, असे निर्देश बांगर यांनी दिले.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील नदी, मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. बांगर यांनी पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नदी / नालेस्वच्छता कामांची बुधवारी पाहणी केली. पश्चिम द्रुतगती महामार्गानजिक गोरेगाव (पूर्व) येथील वालभट नदी,गोरेगाव (पश्चिम) मेट्रो स्थानकाजवळील ओशिवरा नदी, गझधरबंध उदंचन केंद्राजवळील एसएनडीटी नाला, सांताक्रुझ (पश्चिम) येथील नॉर्थ ऍवेन्यू नाला येथे प्रत्यक्ष भेट देऊन बांगर यांनी गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला.

प्रारंभी, बांगर यांनी गोरेगाव (पूर्व) येथील वालभट नदीची पाहणी केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून प्रवाहित होणारी वालभट नदी पुढे दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोकुळधाम वसाहतमार्गे पी दक्षिण विभागाच्या हद्दीतून ५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहते. बिंबीसार नाला या नदीला येऊन मिळतो. पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दगडमिश्रीत माती मोठ्या प्रमाणावर वालभट नदीत वाहून येते. त्यामुळे या नदीतून गाळ उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा बांगर यांनी आढावा घेतला.

काढण्यात आलेल्या गाळाची विहीत वेळेत विल्हेवाट लावावी. गाळ पुन्हा नदीत येऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, गाळ काढण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे नदी / नाल्यात उतरविण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अभियंता, प्रशासकीय विभागातील अभियंत्यांच्या देखरेखीखाली ‘रॅम्प’ तयार करावा. अभियंत्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहावे. कंत्राटदाराकडून चुकीच्या उद्देशाने माती टाकली जात असल्याचा संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी रॅम्पच्या ठिकाणी नागरिकांना ठळकपणे दिसेल अशा स्वरूपाचा फलक प्रदर्शित करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.दिंडोशीपासून सुरू होणाऱ्या पिरामल नाल्यातील पाण्यास अवरोध निर्माण झाल्याने गेल्या वर्षी गोरेगाव (पूर्व) येथील ओबेरॉय मॉलसमोरील सखल भागात पाणी साचले होते. त्याचा आढावा घेत बांगर म्हणाले की, ओबेरॉय मॉल परिसरात पावसाळी पाणी साचण्याच्या

समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे गरेजेचे आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, वाहतूक वर्दळीचा विचार करता पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत कामे करताना मर्यादा येत असल्या तरी त्यावर मात करावी. या ठिकाणी असलेल्या मोरीची (Culvert) स्वच्छता करून वहन क्षमता वाढवावी. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करावे. कल्वर्टची सुधारणा / विस्तार करावा. ओबेरॉय मॉल जंक्शनखाली पूर्व बाजूला ५ x २.५ मीटरच्या दोन मोऱ्या असून पुढे त्या एक होतात. पुढे पश्चिम दिशेला त्यांचा प्रवाह बाहेर पडतो. या मोऱ्यांमध्ये उपयोगिता वाहिन्या असल्यामुळे त्यांची रुंदी कमी झाली आहे. तसेच गाळ साचल्याने त्यांची पाणी वहन क्षमता कमी झाली आहे.या मोऱ्यांमधील राडारोडा, इतर साहित्य काढून टाकावे. त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करावी. नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोरेगाव (पश्चिम) मेट्रो स्थानकाजवळील ओशिवरा नदीतून गाळ काढण्याच्या कामाची, शास्त्री नगर नाला, रिलीफ रोड नाला, पीएनटी नाला, रहेजा प्लॉट नाला, नॉर्थ ऍवेन्यू नाला, साऊथ ऍवेन्यू नाला आणि मेन ऍवेन्यू नाला विलन होत असलेल्या वांद्रे (पश्चिम) येथील एस. एन. डी. टी. नाल्याच्या स्वच्छतेच्या कामाचा आढावाही बांगर यांनी घेतला.