मुंबई : पावसाळापूर्व नालेसफाईला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने महापौर रितू तावडे यांच्या प्रभागातील घाटकोपर येथील नालेसफाईला सुरुवात केली.
मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी मार्च महिन्यापासून नालेसफाईला सुरुवात केली जाते. यंदा अद्याप नालेसफाईला सुरुवात न झाल्यामुळे स्थायी समितीत वादळी चर्चा झाली. त्यानंतर रितू तावडे यांनी महापालिका प्रशसनाची बैठक घेतली व नालेसफाईच्या कामांचा आढावाही घेतला होता. त्यानंतर लगेचच प्रशासन कामाला लागले. घाटकोपर, विद्याविहारचा भाग असलेल्या एन विभागातील नालेसफाईला महापौरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात पाण्याचा जलद निचरा होणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. मे २०२६ अखेरपर्यंत पावसाळ्यापूर्वीचा निर्धारित पूर्ण गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे यावेळी रितू तावडे यांनी सांगितले. तसेच गाळ काढण्याचे काम पारदर्शक पद्धतीने आणि नियोजित वेळेतच पूर्ण व्हावे, असे निर्देशही महापौरांनी दिले.
कुठली कामे सुरू
‘एन’ विभागातील एकूण १४ नाल्यांमधून गाळ काढला जाणार असून या नाल्यांची एकूण लांबी १५,८८५ मीटर इतकी आहे. यामध्ये सोमय्या नाला आणि लक्ष्मीबाग नाला यासारख्या प्रमुख नाल्यांचा समावेश आहे. एकूण २२,५११ मेट्रिक टन गाळ काढण्याचे वार्षिक उद्दिष्ट आहे.
नालेसफाईला यंदा उशीर
मुंबई महापालिकेने संपूर्ण मुंबईतील लहान व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामासाठी गेल्यावर्षीच दोन वर्षांचे कंत्राट दिले होते. त्यामुळे यंदा नालेसफाईसाठी निविदा काढण्याची गरज नव्हती. परंतु, मिठी नदीच्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे नालेसफाईची कामे यंदा रखडली आहेत. मिठी नदीच्या कंत्राटदारांकडे पूर्व उपनगरातील काही नाल्यांच्या सफाईचे कामही होते. ती कामे रखडली आहेत. तसेच गेल्यावर्षी नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांची देयके थकवण्यात आली आहेत. त्यामुळे हे कंत्राटदारही नालेसफाई करण्यास तयार नाहीत. यामुळे यंदा नालेसफाईला उशीर झाला आहे. मात्र घाटकोपमधून नालेसफाईच्या कामाला सुरूवात झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जबाबदारी निश्चित करा
मुंबईत सध्या रस्त्याची कामे सुरू असून त्यामुळेही अनेक ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना घडतात. याबाबत जाब विचारला की अधिकारी टोलवाटोलवी करतात. दुसऱ्या विभागांवर ढकलतात. मात्र यावेळी हे चालणार नाही. तर प्रत्येक कामासाठी जबाबदारी निश्चित करा व त्याकरीता धोरण आणा, अशी सूचना सभागृह नेते गणेश खणकर यांनी आढावा बैठकीच्या वेळी केली. तर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत मोडून काढण्यासाठी अनुभवाची अट रद्द करून नव्या कंत्राटदारांना या कामांसाठी संधी दिली जाणार असल्याचे यावेळी खणकर यांनी सांगितले होते.
