मुंबई : यंदा पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा यासाठी मेट्रो प्रशासनानेही त्यांच्या स्तरावर पाणी उपसा करणारे पंप बसवावेत, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. हे पंप बसवताना प्रत्येक मेट्रोस्थानकाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन व तेथील गरज लक्षात घेऊन योग्य त्या संख्येने व योग्यता क्षमतेचे पंप बसवावेत, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. गेल्यावर्षी मेट्रो ३ च्या वरळी येथील स्थानकात पाणी शिरल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी वरील निर्देश दिले.

पावसाळ्याला अजून तीन चार महिन्यांचा अवधी आहे. तरी येत्या पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबू नये म्हणून मुंबई महापालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये येत्या पावसाळ्यात समन्वय राहावा याकरीता भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी पार पडली.

पावसाळ्यादरम्यान निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांवर मात करण्यासाठी सुयोग्य नियोजन आणि आपापसांत सुसमन्वय साधत सर्व यंत्रणांनी अधिक सक्षमपणे सुसज्ज राहावे, असे निर्देश भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे प्रमुख या नात्याने पालिका आयुक्तांनी यावेळी सर्व प्राधिकरणांच्या प्रमुखांना निर्देश दिले.

मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे, महानगरपालिकेचे सह आयुक्त, विविध परिमंडळ आणि विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर, केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, मेट्रो आणि मोनो रेल्वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तटरक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), मुंबई पोलीस, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व वाहतूक (बेस्ट) इत्यादी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता.

यंदा पावसाच्या पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा यासाठी महापालिकेच्या संबंधित खात्यांबरोबर आणि विभागांसोबत सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे इत्यादींच्या हद्दीत करण्यात येणाऱ्या कामांबाबत नियमित समन्वय साधून प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मेट्रो प्रशासनानेही त्यांच्या स्तरावर पाणी उपसा करणारे पंप बसवावेत. हे पंप बसवताना प्रत्येक मेट्रो स्थानकाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन व तेथील गरज लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या संख्येने व योग्यता क्षमतेचे पंप बसवावेत असेही निर्देश गगराणी यांनी दिले.

हवामान खात्यानेही वेळेत अंदाज वर्तवावे

भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवताना व त्याबाबत सूचना देताना; संबंधित यंत्रणांना त्यांच्या स्तरावरील कार्यवाही करण्यास पुरेसा वेळ मिळायला हवा, ही बाब लक्षात घेऊन पूर्व सूचना द्यावी, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

महाकाय जाहिरात फलकांचेही सर्वेक्षण करा

मुंबईतील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. तसेच, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर आवश्यक आहे, अशा प्रकरणी सुनिश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी. घाटकोपर परिसरातील होर्डिंग दुर्घटनेचा संदर्भ नमूद करत आयुक्तांनी सर्व यंत्रणांना त्यांच्या हद्दीतील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या जाहिरात फलक धोरणानुसार होर्डिंग असल्याची खातरजमा करावी. त्याचसोबत होर्डिंग उभे करण्यात आलेल्या ढाच्याचीही तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे सह सर्व संबंधित यंत्रणांना दिले.