पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांमध्ये कचरा फेकणाऱ्यांना रोखण्यासाठी नाल्यांच्या काठावर उंच जाळ्या बसवण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. दरवर्षी नालेसफाईला सुरुवात झाली की नाल्यांच्या काठावर जाळ्या बसवण्याचा विचार पुढे येतो. यावेळी देखील तसाच विचार प्रशसनाच्या पातळीवर सुरू आहे. पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गेल्या आठवड्यात तसे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले.
पावसाळ्यात नाले तुंबून मुंबईत पाणी साचू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नालेसफाई केली जाते. नाल्यात गाळापेक्षा तरंगत्या कचऱ्याचेच प्रमाण अधिक असते. नाल्याच्या काठावर असणाऱ्या झोपडपट्ट्यांमधून हा कचरा नाल्यात टाकला जातो. त्यामुळे नाले तुंबतात. नालेसफाई केली तरी लगेचच आठ दिवसात नाल्यामध्ये पुन्हा कचरा जमा होतो. गेल्याच आठवड्यात पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी दादर धारावी नाल्यातील प्रचंड कचऱ्याची दखल घेत भिडे यांनी नाल्यांच्या काठावर जाळ्या बसवण्याचे निर्देश दिले.
शहरामध्ये ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये नागरिकांकडून कचरा फेकला जाण्याची समस्या आहे, अशा नाल्यांना जाळ्या बसविण्याचा उपक्रम हाती घ्यावा, जेणेकरून नाल्यांमध्ये कचरा फेकले जाण्यापासून प्रतिबंध होवू शकेल, असे निर्देश भिडे यांनी दिले. नागरिकांकडून फेकला जाणारा तरंगता कचरा ही नालेसफाईतील मोठी समस्या आहे. अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा नालेस्वच्छता करणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
याबाबत अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, ज्या नाल्यांच्या आजूबाजूला झोपडपट्टी आहे अशा ठिकाणी नाल्यांच्या काठावर साधारण आठ फूट उंचीचे जाळीचे कुंपण घालण्याचा विचार आहे. तारेच्या कुंपणाला वरच्या बाजूने एक फुटाचा बाक दिलेला असेल. त्यामुळे वरून कचरा फेकणे शक्य होणार नाही. मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईचा बराचसा भाग हा खोलगट बशीसारखा सखल आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे पर्जन्यजल वाहिन्यांचे जाळे हे त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले आणि १५०८ छोटे नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यातून हे पावसाचे पाणी समुद्रात जात असते. मात्र नाले, गटारे यामध्ये वर्षभर समुद्रातून येणारा व आजूबाजूच्या वस्त्यांमधून टाकला जाणारा कचरा, प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी सामान असा वाटेल तो कचरा साठत असतो. त्यामुळे हे नाले तुंबतात. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी हा गाळ काढणे आवश्यक असते.
