मुंबई : गेल्या सुमारे महिन्यांभराच्या कालावधीत सार्वजनिक, तसेच गृहनिर्माण संस्था, वसाहती आणि इतर खासगी मालमत्तांमध्ये मिळून एकूण ९०२ झाडे उन्मळून पडली, तर १,२५१ फांद्या तुटून पडल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केली. महानगरपालिका क्षेत्रात ३६७ झाडे उन्मळून पडली तर खासगी क्षेत्रात ५२४ झाडे पडली. त्यामुळे झाडांच्या फाद्या छाटणीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
यावर्षी पावसाळ्यात झाड अंगावर पडून तिघांचा मृत्यू झाला. तर चेंबूर येथील दुर्घटनेत शाळेच्या बसवर झाड पडून एका शाळकरी मुलाचा जीव गेला. त्यामुळे पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या प्रकरणी तयार करण्यात आलेल्या चौकशी अहवालात अधिकाऱ्यांना निर्दोष सोडल्यावरून सत्ताधाऱ्यांनीच प्रशासनाचा अहवाल फेटाळला आहे. त्यामुळे झाडे व फांद्या पडण्याच्या दुर्घटनांचे गांभीर्य वाढले आहे.
दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची कामे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जातात. पावसाळापूर्व कामांमध्ये प्रामुख्याने मृत आणि धोकादायक झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांची छाटणी, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे / खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदी कामे केली जातात. मात्र तरीही दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे अशा तक्रारी पालिकेच्या आपात्कालीन विभागाकडे केल्या जातात.
सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र मिळून ३ हजार ८४१ ठिकाणी झाडे, फांद्या हटविणे, वृक्ष छाटणीची कामे मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उर्वरित ५४२ ठिकाणची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
९०२ झाडे १२५१ फांद्या कोसळल्या
मुंबईत २२ जून ते १७ जुलै २०२६ या कालावधीत सार्वजनिक, तसेच गृहनिर्माण संस्था, वसाहती आणि इतर खासगी मालमत्तांमध्ये मिळून एकूण ९०२ झाडे उन्मळून पडली, तर १,२५१ फांद्या कोसळल्या. या सर्व घटनांमध्ये उद्यान विभागाच्या पथकांनी आवश्यक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने तातडीने कार्यवाही करून बहुतांश ठिकाणी झाडे व फांद्या हटवून परिसरातील वाहतूक सुरळीत केली. झाडे व फांद्या हटविण्याची मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे उद्यान विभागाने स्पष्ट केले.
पालिकेच्या हद्दीतील झाडेही पडली
सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्याची छाटणी पालिकेमार्फत केली जातात. तर खासगी जागेतील झाडांची छाटणी संबंधितांनी करायची असते. पालिकेच्या आकडेवारीनुसार, महानगरपालिका क्षेत्रातील ३६७ झाडे उन्मळून पडली. तर खासगी क्षेत्रात ५२४ झाडे पडली. त्याचप्रमाणे, महानगरपालिका क्षेत्रात ५५२ फांद्या कोसळल्या. तर खासगी क्षेत्रात ७२३ फांद्या कोसळल्या.
पालिकेचा मदत क्रमांक
कुठे झाड पडलेले आढळल्यास, झाड कोसळण्याचा धोका जाणवत असल्यास किंवा झाडाची फांदी पडली असल्यास नागरिकांनी तातडीने मुंबई महानगरपालिकेच्या मदत क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे.
