मुंबई : मुंबईत झाडे पडून तिघांचे बळी गेल्यानंतर आणि अकरा जखमी झाल्यानंतर आता मुंबईतील झाडे का उन्मळून पडत आहेत त्याचे कारण शोधण्यासाठी उद्यान विभागाची धावाधाव सुरू झाली आहे. कॉंक्रिटीकरणामुळे झाडे पडली नाहीत असा सूर मुंबई महापालिकेकडून आळवला जात असताना उद्यान विभागाने मात्र रस्त्यांची कामांची माहिती गोळा करून कारणांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. गेल्या सहा दिवसांत मुंबईत ४८० झाडे आणि १२३० फांद्या पडल्या आहेत.
गेले काही दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात उन्मळून पडणारे वृक्ष, झाडांच्या तुटणाऱ्या भल्यामोठ्या फांद्यामुळे मृत आणि जखमींच्या संख्येत वाढ होत असून धास्तावलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने विचारमंथन सुरू केले आहे. गेल्या दशकात पायाभूत सुविधांची विकासकामे, रस्ते बांधणी आणि विविध सेवा पुरवठादार संस्थांना चर खोदण्यास दिलेल्या परवानग्यांबाबत माहिती संकलित करण्याची धडपड उद्यान विभागाने सुरू केली आहे. या कामांचे शास्त्रोक्त विश्लेषण करून झाडांच्या पडझडीमागील कारण शोधण्याची धडपड सुरू आहे. दरम्यान, यापूर्वीच ही काळजी घेतली असती तर झाडांच्या पडझडीला आळा बसून निष्पाप नागरिकांचे प्राण वाचले असते, अशी टीका होऊ लागली आहे.
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी जूनच्या अखेरपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून संततधार पावसामुळे, ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. मुंबईमधील सखलभाग जलमय झाल्यामुळे नागरिकांना फटका बसला असून उन्मळून पडणारे वृक्ष आणि झाडांच्या तुटणाऱ्या भल्यामोठ्या फांद्यांमुळे नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. तसेच अनेक जण जखमीही झाले. वृक्ष उन्मळून पडण्याच्या आणि फांद्या तुटून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महापालिकेच्या उद्यान विभागावर टीका होऊ लागली आहे.
विरोधकांनीही उद्यान विभागाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उद्यान विभागातील अधिकारी धास्तावले असून उद्यान विभागाच्या उपायुक्तांनी गेल्या १० वर्षांतील विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या रस्ते खोदकाम आणि पायाभूत कामांविषयीची माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सदर उपायुक्तांनी परिपत्रक जारी केले असून विविध विभागांना या संदर्भातील माहिती देण्याचे निर्देश परिपत्रकात दिले आहेत.
रस्त्यांची दुरुस्ती, विकास, रुंदीकरण, पुनर्पृष्ठीकरण, पुलांचे बांधकाम, पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम, अस्तीत्वात असलेल्या जलवाहिन्यांच्या मार्गातील बदल, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांची कामे, नव्या सांडपाणी वाहिन्या टाकणे, जुन्या बदलणे, जलपुरवठा विभागाच्या मुख्य जलवाहिन्या आणि वितरण वाहिन्या टाकणे / बदलणे, त्याचबरोबर विविध सेवा पुरवठादार संस्थांना विद्युत वाहिन्या, पाईप, डक्ट्स आदींसाठी चर खोदण्यास दिलेल्या परवानग्यांची माहिती गोळा करण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे.
ही कामे कोणाला दिली होती, बाधित रस्ता – पदपथ आणि परवानगीचा कालावधी आदींचा समावेश त्यात असावा, असे निर्देश उद्यान विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आले आहेत. विविध विभागांकडून उपलब्ध होणाऱ्या तपशिलाचे शास्त्रीय विश्लेषण करून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या झाडांच्या पडझडीमागील कारण शोधण्यात येणार आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. विविध विभागांकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीचे संकलन आणि विश्लेषण करून याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
